मोठी बातमी; पुण्याहून सोलापूरसाठी आणलेल्या लसी आता टेंभुर्णी, मोहोळला उतरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 12:00 PM2021-07-09T12:00:14+5:302021-07-09T12:00:21+5:30
टेंभुर्णी, मोहोळला थांबा : जिल्ह्यात दोन लाख लाभार्थींमध्ये झाली वाढ
सोलापूर : सोलापूर शहर व ग्रामीण भागात एकाचदिवशी लसीकरण होण्यासाठी पुण्याहून लस आणताना टेंभुर्णी, मोहोळला थांबा देऊन लसीकरणाचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली. सोलापूर शहर व ग्रामीण भागात लस येते कधी व लसीकरण होते कधी, याची माहिती मिळत नसल्याने नागरिकांत गोंधळ उडत चालला आहे. ‘लसींसाठी सोलापूर तडफडतयं, कुणी वाली नसल्याचा अनुभव’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने जिल्ह्यातील लसीकरणाबाबत असलेल्या वास्तवतेकडे लक्ष वेधले. याची दखल आरोग्य विभागाने घेतल्याचे डॉ. पिंपळे यांनी सांगितले.
जिल्ह्यात लस उपलब्ध होईल तसे एकाचवेळी लसीकरण करण्याचे आता नव्याने नियोजन करण्यात आले आहे. पुण्याहून लस आणताना टेंभुर्णी व मोहोळला व्हॅन थांबवून या परिसरातील आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयाला लस वाटप केली जाईल. त्यानंतर सोलापुरातील शासकीय रुग्णालयातील गोदामात साठा करून महापालिका व इतर आरोग्य केंद्रांना एकाचवेळी वितरित केली जाईल. लस एकाचवेळी सर्वांना उपलब्ध केल्याने दुसऱ्या दिवशी एकाचवेळी सर्व केंद्रांवर लसीकरण सुरू होणार आहे.
लाभार्थींमध्ये वाढ
सन २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या ४३ लाख १७ हजार गृहित धरून ३८ लाख लाभार्थी अपेक्षित धरले होते. पण कोरोना काळात जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे नोकरी व शिक्षणासाठी गेलेले अनेक नागरिक जिल्ह्यात परतले आहेत. त्यामुळे ४६ लाख लोकसंख्या गृहित धरून दोन लाखाने लाभार्थी वाढतील, असा अंदाज करण्यात आल्याचे डॉ. पिंपळे यांनी सांगितले.
गरोदर मातांना लस
गरोदर मातांनाही कोविशिल्डची लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर गरोदर माता, आरोग्य कर्मचारी आणि मधुमेह असणाऱ्या हाय रिस्क रुग्णांसाठी एन्फ्लुएंझाची लस उपलब्ध झाली आहे. शासकीय व ग्रामीण रुग्णालयात ही लस उपलब्ध करण्यात येणार आहे.
लसीनंतर हे ध्यान्यात घ्या...
सध्या ग्रामीण भागातील सर्वांसाठी कोविशिल्ड लसीचा डोस उपलब्ध करण्यात येत आहे. ही लस घेतल्यानंतर ८४ दिवसांनी दुसरा डोस घेणे बंधनकारक आहे. शहरात १८ वर्षांपुढील तरुणांना कोव्हॅक्सिनची लस उपलब्ध करण्यात आली आहे. ही लस घेतलेल्यांनी ४ आठवड्यानंतर दुसरा डोस घेणे बंधकारक आहे. तरच या लसीची सुरक्षा लाभार्थींना मिळणार असल्याचे आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.