मोठी बातमी; हेल्मेट न घालणाऱ्या सोलापुरातील २७ पोलीस कर्मचाऱ्यांची वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2022 05:23 PM2022-02-13T17:23:30+5:302022-02-13T17:23:38+5:30
वाहतूक शाखेची कारवाई : १३ हजार ५०० रुपयांचा दंड
सोलापूर : शहरातील रस्त्यावरून विनाहेल्मेट वाहन चालवणाऱ्या २७ पोलिसांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. १३ हजार ५०० रुपयांचा दंड लावण्यात आला असून, त्यांची वाहने जप्त करण्यात आली आहेत.
शहरातील वाहतुकीला शिस्त येण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रथमत: पोलिसांनी नियम पाळावा म्हणून वाहतूक शाखेच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईत १७ पोलिसांवर कारवाई केली. दरम्यान, त्यांची वाहने जप्त केली होती. सलग दुसऱ्या दिवशी शनिवारीही कारवाई केली. शहरातील विविध भागांत रस्त्यावरून विनाहेल्मेट वाहन चालवणाऱ्या पोलिसांना आडवून कारवाई केली. शहर पोलीस आयुक्तालयाजवळीलही पोलिसांवर विनाहेल्मेट असलेल्या कर्मचाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड लावण्यात आला. वाहतूक शाखेचे क्रेन बोलावून सर्वांची वाहने जप्त करण्यात आली. वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी करत असताना प्रथमत: आपले कर्मचारी त्याचे पालन करतात की नाही, हे पाहिले जात आहे. हेल्मेट न घालणाऱ्या पोलिसांवरच कारवाई केली जात आहे.
पोलिसांवर होत असलेल्या कारवाईमुळे खळबळ
शहरात वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलिसांवरच कारवाई करत असल्याने खळबळ उडाली आहे. बहुतांश पोलीस आता हेल्मेट घालून बाहेर पडत आहेत. संबंधित पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्याकडूनही कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. पोलीसच पोलिसांवर कारवाई करत असल्याचे पाहून सर्वसामान्य नागरिक चकित होत आहेत.
हेल्मेट स्वत:च्या संरक्षणासाठी आहे, नागरिकांनीही त्याचे पालन केले पाहिजे. पुढील काळात विनाहेल्मेटची कारवाई करणार आहोत, त्याची सुरुवात आम्ही पोलिसांपासूनच करीत आहोत. ही कारवाई यापुढेही अशीच चालू राहणार आहे.
दीपक आर्वे, सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक शाखा)