मोठी बातमी; वाळू घाटावर नियमांचे उल्लंघन; व्हाॅटस्ॲपद्वारे केली तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 06:09 PM2022-04-18T18:09:12+5:302022-04-18T18:09:20+5:30
तहसीलदार लागले कामाला : सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश
सोलापूर : वाळू उपसा सुरू असलेल्या दोन घाटांविरोधात जिल्हा प्रशासनाकडे तक्रार प्राप्त झाल्या आहेत. वाळू घाटांवर हरित लवाद आणि शासकीय नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आणि व्हिडिओ जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. वाळू घाटावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संबंधित तहसीलदारांना दिला आहे.
जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनंतर मागच्या आठवड्यात मिरी-सिद्धापूर, घोडेश्वर तामदर्डी या दोन्ही वाळू घाटांवर वाळू उपसा सुरू झाला आहे. उपसा सुरू होऊन दहा दिवस होत नाहीत तोच दोन्ही घाटांविरोधात अनेक तक्रारी झाल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. यांत्रिक मशिनरींचाही (बोटी) वापर होत असल्याच्या तक्रारी आहेत.
यांच्याकडे ताबा
मिरी-तांडोर साठा क्रमांक १ मंगलमूर्ती स्टोन क्रशर यांनी १२.३४ कोटी, मिरी-सिद्धापूर साठा क्रमांक १ शिक्षंदा लाइफ स्टाइल यांनी ७.९२ कोटी, घोडेश्वर तामदर्डी साठा क्रमांक १ चौधरी पॉवर प्रोजेक्ट यांनी ३.५३ कोटी, तर घोडेश्वर तामदर्डी साठा क्रमांक २ प्रतीक इन्फ्रास्ट्रक्चर यांनी ५.११ कोटी रुपयांस घेतला आहे. यापैकी शिक्षंदा व प्रतीक इन्फ्रास्ट्रक्चर यांनी १०० टक्के रक्कम यापूर्वी भरली आहे. मिरी-तांडोर येथील साठ्यास सर्वाधिक १२ कोटी ३४ लाख रुपये मिळाले आहेत. मंगलमूर्ती स्टोन क्रशर यांनी हा मक्ता घेतला आहे. घोडेश्वर तामदर्डी साठा क्रमांक १ चे चौधरी पॉवर प्रोजेक्ट यांनी ३.५३ कोटी रुपयाची रॉयल्टी शासनाकडे जमा केली आहे. चारपैकी मिरी-सिद्धापूर साठा क्रमांक १ शिक्षंदा लाइफ स्टाइल, घोडेश्वर- तामदर्डी साठा क्रमांक २ प्रतीक इन्फ्रास्ट्रक्चर यांनी पर्यावरण विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र दाखल केल्याने या दोन वाळू साठ्यांचा ताबा ठेकेेदारांना दिला गेला. आठ ते दहा दिवसांपासून वाळू उपसा सुरू झालेला आहे.