मोठी बातमी; वाळूच्या व्यवसायातील लाभार्थ्यांना निलंबित करणार; राधाकृष्ण विखे-पाटलांची माहिती
By Appasaheb.patil | Published: October 4, 2022 12:48 PM2022-10-04T12:48:56+5:302022-10-04T12:49:02+5:30
पंढरपूरच्या विकास आराखड्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांची नेमणूक होणार
पंढरपूर : अवैध वाळू उपसा मुळे अनेक माफिया तयार होत असून त्यांना अधिकारी व कर्मचारी मदत करत असतात. यामुळे वाळूच्या व्यवसायातील लाभार्थी बरेच आहेत. अशा लाभार्थ्यांना निलंबित करणार असल्याचे पालकमंत्री राधकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. यावेळी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. राजेंद्र राऊत, आ. राम सातपुते, माजी आमदार प्रशांत परिचारक, आ. समाधान आवताडे, आ. शहाजीबापू पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.
चंद्रभागा नदीपात्रात व पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील भीमा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा राजरोसपणे सुरू असतो. त्याचबरोबर शहर व तालुका पोलीस ठाण्यात अवैध वाळू उपस्या बाबत गुन्हे दाखल करण्यात येतात. त्यामध्ये वाहन किंवा वाळू वाहतूक करणारे गाढवे पकडण्यात येते. परंतु वाळू माफियांचे नावेही निष्पन्न होत नाहीत व वाळू माफियांना पकडण्यात येत नाहीत. अशा घटनांमुळे वाळू उपसा करणाऱ्या लोकांचे मनोधर्य वाढते.
त्याचबरोबर मागील वर्षी नदीवरील नवीन पुलावरून पहाटेच्या वेळी वॉकिंग करत एक महिला व पुरुषाला वाळू उपसा करणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पंढरपुरातील महाराज म्हणून ओळख असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याची देखील काही काळासाठी मुख्यालयात बदली करण्यात आली होती. परंतु त्यास पुन्हा पंढरपुरात हजर करून घेण्यात आले आहे. त्याची नियुक्ती श्री विठ्ठल मंदिरला असताना देखील तो शहर पोलीस ठाण्यात काम करत आहे. अशा लोकांवर योग्य ती कारवाई झाली नसल्याने शहरात व तालुक्यात खुल्या वाळू उपसा होत असल्याचे दिसून येत आहे. असल्याची माहिती पत्रकारांनी सांगितल्या नंतर वाळूच्या व्यवसायातील लाभार्थ्यांना निलंबित करणार असल्याचे पालकमंत्री राधकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
विकास आराखड्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी देणार...
पंढरपूर विकास आराखडा संदर्भात अनेक निवेदन आली आहेत. ज्या गावचा विकास करायचा आहे. त्याच गावाला माहीत नसेल काय होणार आहे. त्या विकासाचा काय उपयोग. सर्वांना एकत्र बोलावून पंढरपुरात बैठक घेऊ. या विकास आराखड्यासाठी प्रभारी अधिकारी असेल तर त्याला सर्व एजन्सींशी संपर्क ठेवणे अवघड जाते. यामुळे अतिरिक्त जिल्हाधिकारी देणार असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.