मोठी बातमी; लस घेणार नाही ना?; आता राहा निर्बंधातच; शासनाच्या निकषात सोलापूर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 05:40 PM2022-02-02T17:40:52+5:302022-02-02T17:40:57+5:30
सोलापूर : सांगितलं तर ऐकलं नाही ना सोलापूरकरांनो..! लस घ्या..लस.. घ्या म्हटलं हजारदा, तरी ऐकलं नाही. लसीकरण केंद्राकडे पावणेपाच ...
सोलापूर : सांगितलं तर ऐकलं नाही ना सोलापूरकरांनो..! लस घ्या..लस.. घ्या म्हटलं हजारदा, तरी ऐकलं नाही. लसीकरण केंद्राकडे पावणेपाच लाख सोलापूरकर अद्याप गेले नाहीत. तर पात्र असूनही पावणेचार लाख नागरिकांनी अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही. याचा फटका ४१ लाख सोलापूरकरांना बसणार आहे.
ज्या जिल्ह्यात लसीकरण चांगले झाले आहे, त्या जिल्ह्यात कोरोना निर्बंध शिथिल करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. शासनाच्या निकषात सोलापूर जिल्हा बसणार नाही. त्यामुळे आणखीन काही दिवस लाखो सोलापूरकरांना निर्बंधात्तच रहावं लागेल. ज्या जिल्ह्यात पहिला डोस घेतलेल्यांची टक्केवारी ९० टक्के आहे. तसेच दुसरा डोस घेतलेल्यांची टक्केवारी ७० टक्के आहे. त्याठिकाणी कोरोना निर्बंधात शिथिलता येणार आहे, तसे आदेश राज्य शासनाने दिले असून सोलापूरकर मात्र लसीकरणात मागे असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात कोरोना निर्बंध कायम राहतील. याचा फटका येथील उद्योग, व्यापार आणि बाजारपेठांना तसेच शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसणार आहे.
- पहिला डोस घेतलेल्यांची संख्या- २९ लाख ३२ हजार ९४१
- टक्केवारी - ८५.९ टक्के
- दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या-१९ लाख ४८ हजार ८३
- टक्केवारी -५७ टक्के
- पहिला डोस न घेतलेल्यांची संख्या- ४ लाख ८१ हजार ४५९
- दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या- ३ लाख ८२ हजार
............
बूस्टर डोसलाही अल्प प्रतिसाद
सहा हजार १७७ हेल्थ वर्कर तसेच ३ हजार ४२० फ्रन्टलाइन वर्कर्सनी बूस्टर डोस घेतला आहे. साठ वर्षांपुढील पाच हजार २९८ नागरिकांनी तसेच ४५ वयोगटातील पुढील ५ हजार २९० नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. बूस्टर डोसला अल्प प्रतिसाद मिळत आहे. १५ ते १७ वयोगटातील ७६ हजार ४९० किशोरवयीन मुलांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे. २८ दिवस पूर्ण झालेल्या २९४ किशोरवयीन मुलांनी दुसरा डोस घेतला आहे.
ज्यांनी अद्याप पहिला डोस घेतलेला नाही, त्यांनी प्राधान्याने लस घ्यावा. दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या नागरिकांनीही लसीकरण केंद्रात जाऊन दुसरा डोस घ्यावा. जे बूस्टर डोससाठी पात्र आहेत. त्यांना प्रशासनाकडून संपर्क साधून बूस्टर डोस दिला जात आहे.
-मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर