विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटलांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2021 06:45 PM2021-11-02T18:45:48+5:302021-11-02T18:45:56+5:30
पोलीस आयुक्तांची कारवाई : शहर पोलीस आयुक्तालयात खळबळ
सोलापूर : विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, डीबी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांच्यासह आठ कर्मचाऱ्यांची सोमवारी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील व डीबी पथकाचे प्रमुख शीतलकुमार कोल्हाळ यांची पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाला बदली करण्यात आली आहे. डीबी पथकातील राजकुमार तोळनुरे, श्रीरंग खांडेकर, पिंटू जाधव, शिवानंद भीमदे, अंबादास गड्डम, अतिश पाटील, इम्रान जमादार, राठोड या आठ लोकांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त हरिष बैजल यांनी अचानक केलेल्या तडकाफडकी बदल्यांमुळे शहर पोलीस आयुक्तालयात खळबळ उडाली आहे. दि. ३० ऑक्टोबर रोजी रात्री विजापूर रोडवरील नागेश डान्सबारवर सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे यांनी अवघ्या तीन कर्मचाऱ्यांसमवेत कारवाई केली होती. डान्सबारमध्ये सुरू असलेले अश्लील नृत्य व ग्राहकांची गर्दी पाहून त्यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलावले होते. सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे या स्वतः जाऊन डान्स बारवर कारवाई करतात; मग याची कल्पना संबंधित पोलीस स्टेशनला नव्हती का? असा एक प्रश्न निर्माण झाला होता. याची दखल घेत दोन अधिकारी व आठ डीबी पथकातील पोलीस कर्मचारी यांच्यावर तडकाफडकी बदलीची कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व आठ कर्मचाऱ्यांवर बदलीची कारवाई करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव कारवाई केली आहे.
- हरिष बैजल, पोलीस आयुक्त.