बल्करच्या चाकाखाली गेल्यानं दुचाकीस्वाराच्या शरीराचे तुकडे; जड वाहतुकीचा आणखी एक बळी
By विलास जळकोटकर | Published: June 8, 2024 05:28 PM2024-06-08T17:28:20+5:302024-06-08T17:29:37+5:30
जडवाहतुकीमुळे झालेल्या अपघातात आणखी एका तरुणाचा बळी गेला.
विलास जळकोटकर, सोलापूर : जडवाहतुकीमुळे झालेल्या अपघातात आणखी एका तरुणाचा बळी गेला. शांती चौक अक्कलकोट रोड पाण्याच्या टाकीजवळ सुसाट वेगानं येणाऱ्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या बल्कर वाहनाच्या चाकाखाली गेल्यानं दुचाकीस्वार जागीच ठार झाला. त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. शनिवारी सकाळी ६:३० च्या सुमारास हा धक्कादायक अपघात झाला. सुनील शिवाजी पवार (वय ४२, रा. स्वागत नगर, गजानन शाळेजवळ, सोलापूर) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
यातील मयत दुचाकीस्वार हा मूळचा स्वागत नगर येथील असून, तो तामलवाडी येथील व्यंकटेश्वरा सिमेंट पाईल कारखान्यात कामाला असल्यामुळे मगर सांगवी (ता. तुळजापूर) येथील सासरवाडीत राहत होता. तेथून तो दररोज कारखान्याला ये-जा करीत होता.
दोन दिवसापूर्वी त्याच्या आजीचे निधन झाले होते. शनिवारी तिसरा दिवस असल्याने तो सांगवी येथून पत्नीसह अक्कलकोट रोडवरील शांती चौक स्मशानभूमीत राख सावडण्यासाठी आला होता. ही वेळ साधारण सहाची होती. स्वागतनगर येथून नातलग अद्याप स्मशानभूमीजवळ न दिसल्याने तो स्वागत नगराच्या दिशेने शांती चौक पास करुन जात असताना सुसाट वेगाने येणाऱ्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या बल्कर वाहनाच्या मागील चाकाखाली गेला. सुदैवानं पत्नीला बाजूला पडली. यात त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाल्याचे नातलगांनी सांगितले.
अपघाताची खबर जेलरोड पोलीस ठाण्यास मिळताच सहा. फौजदार सय्यद घटनास्थळी पोहचले. सकाळी ८ वाजता त्याचा मतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला.