हत्तूर- गाव बायपास रोडवर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By विलास जळकोटकर | Updated: September 4, 2023 16:43 IST2023-09-04T16:43:26+5:302023-09-04T16:43:57+5:30
हत्तूर-केगाव बायपास रोडवर भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला.

हत्तूर- गाव बायपास रोडवर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
सोलापूर : हत्तूर-केगाव बायपास रोडवर भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला. उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्याचा वाटेत मृत्यू झाला. भाटेवाडी-डोणगावच्या शिवारामध्ये सोमवारी हा अपघात झाला. तिपण्णा शरणप्पा तोळणूरे (वय- ६४, रा. हत्तूर, ता. द. सोलापूर) असे मयताचे नाव आहे.
यातील मयत तिपण्णा हे सोमवारी सकाळी हत्तूर येथून केगाव बायपास रोडवरुन दुचाकीवरुन निघाले होते. दुपारच्यावेळी त्यांची दुचाकी भाडेवाडी-डोणगाव शिवारातून जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यामध्ये तिपण्णा यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली. सर्वांगाला मार लागला. जोराची धडक लागल्यामुळे त्यांची शुद्ध हरपली.
या अपघाताची खबर सलगरवस्ती पोलिसांना मिळताच घटनास्थळी हवालदार वाल्मिकी यांनी भेट दिली. गंभीर अवस्थेतील बेशुद्ध तिपण्णा यांना वाहनाद्वारे शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले. येथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.