शेअर मार्केटच्या नावाने माजी नगराध्यक्षांसह बड्या मंडळींना कोट्यवधींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 12:20 PM2022-01-15T12:20:11+5:302022-01-15T12:21:17+5:30
पोलीस अधिकारी, आ. राजेंद्र राऊत, शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर यांनी केलेल्या आवाहनानुसार पोलिसात तक्रार देण्यासाठी फसवणूक झालेले पुढे येऊ लागले आहेत.
सोलापूर/बार्शी - शेअर मार्केटच्या नावाखाली बार्शीकरांना शेकडो कोटींचा गंडा घालून गेलेल्या विशाल फटे याच्यावर अखेर बार्शी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच त्याचे बार्शीतील अलिपूर रोडवरील घरदेखील पोलिसांनी सील केले. त्याच्या कार्यालयातील कॉम्प्युटर व अनुषंगिक साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीस अधिकारी, आ. राजेंद्र राऊत, शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर यांनी केलेल्या आवाहनानुसार पोलिसात तक्रार देण्यासाठी फसवणूक झालेले पुढे येऊ लागले आहेत. अनेकांच्या एक नंबर खात्यावरून अनेकांच्या रोख दिलेल्या रकमा मोठ्या आहेत. हा फटे गेल्या चार वर्षांपासून ही स्किम राबवत होता. कित्येकांना त्याने पैसे चार ते पाचपट करून दिले आहेत. त्यातील तेवढ्याच लोकांनी आपले पैसे आणखी वाढतील या आशेने त्याच्याकडेच गुंतवले आहेत. तर काही हुशार लोकांनी किमान आपले मुद्दल तरी काढून घेतले आहे़. पोलिसांनी त्यांच्या सर्व कंपनीच्या व त्याच्या कुटुंबीयाच्या नावाने कोणत्या बँकेत खाती आहेत त्याचा शोध सुरु केला आहे. तसेच बुधवारी बार्शीतून गायब झालेल्या त्याच्या आईवडील, भाऊ व भावजय यांचा शोध सुरु केला आहे़ त्यांचे सर्व मोबाईल नंबरही ट्रॅकवर टाकले आहेत़ फटे हे मूळचे मंगळवेढा तालुक्यातील असले तरी त्यांचा गावाकडे फारसा संपर्क नव्हता. त्यांना तिकडे कोणीच ओळखतदेखील नव्हते.
ट्रेडिंगचा व्यवसायही बंद केला होता
विशाल फटे हा मी शेअर बाजारात गुंतवणूक करुन रिटर्न मिळवून देता असे भासवत होता. मागील काही वर्षांपूर्वी तो ट्रेडिंग करीत होता़ मात्र मागील दोन-तीन वर्षांत आम्ही त्याला प्रत्यक्ष ट्रेडिंग करताना कधी पाहिलेच नाही. असे फिर्यादी दीपक अंबारे यांनी सांगितले.
विशालका नावाने तयार केला ॲप
अल्गो ट्रेडिंगच्या नावाखाली हो अॅॅटो ट्रेड करुन मोठ्या प्रमाणात रिटर्न देत होता असे बोलायचा़ त्याच्या विशालका या वेबसाईटचे एक अॅप त्याने तयार केले होते. तो त्या संबंधित ग्राहकांना द्यायचा. कृत्रिमरीत्या या अॅपवर ट्रेड केलेल्या नोंदी तयार करायचा व आज एवढा प्रॉफिट झाला असे दाखवून त्यांना पैसेदेखील देत होता. मात्र अशा प्रकारे तो कुठलेच ट्रेडिंग करीत नव्हता हे आता स्पष्ट होत आहे.
ग्रे मार्केटमध्ये पैसे लावत होता की नव्हता
तो कोणत्याही शेअर बाजारात पैसे लावत नव्हता़ तसेच तो बोलत असलेल्या आयपीओ ग्रे मार्केटमध्ये देखील पैसे लावत होता की नव्हता, हेदेखील एक न उलगडलेले कोडेच आहे. हे आता तपासातच हे कळणार आहे.
सुपर फोर्टी १० लाखांवर एका वर्षात सहा हजार टक्के रिटर्न
मागील एक महिन्यापूर्वी त्याने त्याच्याकडे असलेल्या सर्व गुंतवणूकदारांना व्हाॅटस्अपवर मेसेज पाठवला होता. त्यामध्ये त्याने गुंतवणूकदारांना मी अल्गोचा एक नवीन कोड तयार केला आहे. त्यामध्ये आपण गरीब खातेदाराचे प्रत्येकी दहा लाख रुपये घेणार आहे़. त्यांना त्या कोडच्या माध्यमातून वर्षात सहा हजार टक्के रिटर्न मिळवून देणार आहे. हे पैसे वर्षभर काढता येणार नाहीत. तसेच या माध्यमातून मला जगासमोर एक सक्सेस मॉडेल आणायचे आहे आणि गरिबांना श्रीमंत करायचे आहे़ मी यात एकाही मोठ्या माणसांची गुंतवणूक घेणार नाही. असे त्याचे म्हणणे होते. या स्कीममधून देखील त्याने मागील महिन्यात साधारणपणे चार ते पाच कोटी रुपये जमा केल्याचे खात्रीशीर वृत्त आहे़
पासपोर्ट ब्लॉक, समुद्रमार्गे दुबईला गेल्याची चर्चा
पोलिसांनी त्याचा पासपोर्टदेखील ब्लॉक केला असल्याचे वृत्त आहे़ त्यामुळे तो परदेशात तरी गेला नसल्याचे पोलिसांच्या बोलण्यावरून दिसून येत आहे़. काही जण तो समुद्रमार्गे दुबईला गेला असल्याचेही बोलले जात आहे.
फटेला घेऊन फिरणारेच आता त्यात अडकलेत
काही मंडळी फटेला घेऊन मोठमोठ्या लोकांकडे जात होते. आता तीच मंडळी आता त्याच्यावर आरोप करीत आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी होण्यासाठी तपास सीबीआयकडे देण्याची मागणी करणार असल्याचे शिवसेना प्रमुख भाऊसाहेब आंधळकर यांनी सांगितले. ही फसवणुकीची घटना ज्या वेळी वृत्तपत्राच्या माध्यमातूनच जनतेसमोर आली. त्या वेळी लोक जागे होत आहेत. पोलिसांवर आरोप करण्यापेक्षा यापूर्वीला जनतेला सावध करण्यासाठी राजकीय मंडळींनी पुढे येण्याची गरज होती. आता पोलिसांवर आरोप करुनही राजकारण करण्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळे या प्रकरणात राजकारण न आणता लोकांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचेही आंधळकर यांनी सांगितले.