सेकंडहॅन्ड गाड्यांच्या बाजारात कोट्यवधींची उलाढाल, चोरीचा व्यवहार शोधण्यासाठी पोलिसांची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 11:34 AM2021-12-02T11:34:43+5:302021-12-02T11:35:22+5:30
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली चौकशी : संशय आल्यास तत्काळ पोलिसांना संपर्क साधण्याचे केले आवाहन
सोलापूर : शहर व जिल्ह्यात सेकंडहॅन्ड गाड्यांच्या बाजारात कोट्यवधींची उलाढाल होत असून, मात्र चोरीचा व्यवहार शाेधण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाडी टाकून तपासणी केली आहे. दरम्यान, संबंधित एजंटांना मोटारसायकलीचा संशय आल्यास तत्काळ पोलिसांना संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नंदकिशोर सोळुंके यांच्या पथकाने मोटारसायकल चोराचा शोध घेण्यासाठी ग्रामीण हद्दीत जाऊन दोघांना अटक केली. दोघांनी शहरात दोन, तर १८ गाड्या पुणे, चाकण, लातूर, उस्मानाबाद व ग्रामीणमधील बार्शी, मंगळवेढा आदी भागातून चोरल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेला एक चोर हा जुन्या मोटारसायकली खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले. मोटारसायकली खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याने लोक त्याच्यावर विश्वास ठेवून गाड्या घेत होते. हा प्रकार लक्षात आल्यामुळे पोलिसांनी दुसऱ्याचदिवशी शहरातील २० ठिकाणी धाडी टाकत जुन्या मोटारसायकलींची पाहणी केली. संबंधित एजंटाकडून माहिती घेतली.
दोन टक्क्याने वर्षाकाठी १२ कोटींचे कमिशन
० जुन्या गाड्या खरेदी-विक्रीच्या व्यवसायात मोटारसायकलचे मॉडेल पाहून किमान १५ ते २० हजारांपासून विक्री केली जाते. देणाऱ्याकडून व घेणाऱ्याकडून २ टक्केप्रमाणे एकूण ४ टक्के कमिशन मिळते. शहरात वर्षाकाठी सुमारे १०० कोटींची, तर जिल्ह्यात ग्रामीण भागात १५० ते २०० कोटींची उलाढाल होत असते. एकंदरीत या व्यवहारातून शहर व जिल्ह्यातील एजंटांना वर्षाकाठी सुमारे १२ कोटीपर्यंतचे कमिशन मिळत असल्याचे बोलले जाते. या व्यवहारात बहुतांश गॅरेजचालकही सहभागी असतात.
मोटारसायकली का विकल्या जातात?
- ० बहुतांश लोकांना नवीन मोटारसायकली किमान पाच वर्षांपर्यंत वापरण्याची सवय असते.
- ० बाजारात आलेल्या नवीन मॉडेलची गाडी घेण्यासाठी जुनी मोटारसायकल विकली जाते.
- ० मोटारसायकल वापरून झाल्यावर काहींना चारचाकी कार वापरण्याची गरज वाटू लागते, त्यामुळेही गाडी विकतात.
- ० नवीन घेतलेल्या मोटारसायकलचा अपघात झाल्यास त्यांना ती अशुभ वाटते, त्यामुळेही विकण्याचा निर्णय घेतात.
जुन्या मोटारसायकली का घेतात?
- ० बऱ्याचजणांना मोटारसायकलची गरज असते, मात्र त्याची किंमत किमान ७० हजारांपासून दीड लाखांपर्यंत असते. त्यामुळे नवीन गाडी घेण्याची ऐपत नसते.
- ० नवीन गाडी घ्यायची झाल्यास सर्वसामान्य लोकांना राष्ट्रीयीकृत बॅंका लवकर कर्ज देत नाहीत. फायनान्स कंपनीकडून मिळते; मात्र त्याचा व्याजदर जास्त असतो. हप्ता चुकल्यास गाड्या जप्त होण्याची भीती असते. त्यामुळे अनेकजण जुन्या गाड्या खरेदी करतात.
- ० कामासाठी सुरुवातीला जुन्या गाड्या घेतात त्यानंतर नवीन घेण्याचा विचार करतात.
ग्रामीण भागातील एका एजंटाकडून चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्यानंतर शहरातील सर्व एजंटांकडे जाऊन चौकशी केली आहे. गाड्या घेताना कागदपत्रे पाहून रितसर व्यवहार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संशय आल्यास पोलिसांना संपर्क करण्यास सांगितले आहे.
- बापू बांगर, पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा)
जुन्या गाड्या घेत असताना प्रथमत: त्याची कागदपत्रे पाहतो. नंतर चेसीनंबर व मॉडेल बघतो. त्यानंतर ती आणखी किती वर्ष चालते, याचा अंदाज घेतो. आमच्याकडे एक फॉर्मेट असतो. त्यावर गाडी कोणाची आहे, कधी घेतली, मालक तोच असेल त्याचा आधार कार्ड घेतो. गाडीला लगेच ग्राहक असेल, तर दोघांकडून प्रत्येकी ५०० रुपये कमिशन घेतो. सर्व खात्री करूनच आम्ही व्यवहार करतो.
खालीदभाई सालार, गॅरेजमालक/एजंट