माळकवठ्यात बोगस डॉक्टरांचे बिंग फुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:23 AM2021-05-07T04:23:40+5:302021-05-07T04:23:40+5:30
दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल देसाई यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिगंबर गायकवाड यांच्यासह माळकवठे गावाला भेट ...
दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल देसाई यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिगंबर गायकवाड यांच्यासह माळकवठे गावाला भेट देऊन कोविड नियंत्रणासाठी ग्रामस्थांची बैठक घेतली. बैठकीत गावात अवैध वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. बीडीओ राहुल देसाई यांनी दोन दवाखान्यांना भेटी दिल्या. या भेटीत हसनसाब सैपनसाब मुजावर आणि विश्वनाथ रमेश अळलीमोरे हे कोणतीही पदवी नसताना व्यवसाय करीत असल्याचे आढळले.
दवाखान्यात औषधे, गोळ्या, पीपीई किट आदी साहित्य आढळून आले, ते जप्त करण्यात आले. वरील दोघांविरुद्ध मंद्रुप पोलीस ठाण्यात राहुल देसाई यांनी फिर्याद दिली. हसनसाब मुजावर आणि विश्वनाथ अळ्ळीमोरे यांच्याविरोधात भादंवि कलम ४१९, ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----
नॅचरोपॅथीची पदविका अन् प्रॅक्टिस अलोपॅथीची
दोन्ही बोगस डॉक्टरांकडे वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक असणारी प्रमाणपत्राची मागणी केली असता त्यांची भंबेरी उडाली. दोघेही उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. कायदेशीर भाषेत विचारणा केल्यानंतर त्यांनी नॅचरोपॅथीची पदविका असल्याचे मान्य केले. यातील हसनसाब मुजावर हा १५ वर्षे तर विश्वनाथ अळ्ळीमोरे ५ वर्षांपासून माळकवठे येथे व्यवसाय करीत आहे.