भरारी घेता-घेता पक्षी पतंगाच्या मांजात फसला; पक्षीप्रेमी अन् लोकांच्या मदतीने सुखरूप सुटला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 04:20 PM2019-06-29T16:20:15+5:302019-06-29T16:23:13+5:30
वन अधिकाºयांची तत्परता : उपचाराने ‘राखी धनेश’ची निसर्गात भरारी
सोलापूर : निसर्गामध्ये स्वच्छंद भरारी घेता-घेता राखी धनेश नामक मोठा पक्षी पतंगाच्या मांजामध्ये फसला.. विजापूर रोडवरील कोर्ट कॉलनीमधील ही घटना.. लागलीच पक्ष्यांप्रति प्रेम असलेली मंडळी धावली.. लगबगीनं त्यांनी वन विभागाशी संपर्क साधला.. त्यांनीही तत्परता दाखवून केलेल्या प्रयत्नानं एक दिवसाच्या मुक्कामानंतर बुधवारी त्याला पुन्हा निसर्गाच्या स्वाधीन केले. मोकळा श्वास घेत या पक्ष्यानंही मुक्तपणे भरारी घेतली.
या घटनेची पार्श्वभूमी अशी की, २५ जून मंगळवारचा दिवस.. विजापूर रोडवरील कोर्ट कॉलनी परिसरात आकाशात भरारी घेणारा एक मोठा पक्षी पतंगाच्या मांजामध्ये फसल्यामुळे तो जायबंदी झाला होता. कोणीतरी वन विभागाला कॉल करण्याची सूचना केली. काही उत्साही मंडळींनी लागलीच फोन न करता थेट वन परिक्षेत्र अधिकरी निकेतन जाधव यांच्या घराचा पत्ता शोधत त्यांच्या घरी पोहोचले. जाधव दिवसभर कामाच्या निमित्ताने प्रवास करून घरी आलेले. त्यांनी लागलीच पक्षी बरा झाला पाहिजे, या भावनेतून घटनास्थळी धाव घेतली.
तेथील लोकांच्या मदतीने जायबंदी झालेल्या राखी धनेश पक्ष्याला खाली उतरवले. टॉवेलच्या साहाय्याने त्याला पकडून घराकडे आणले. या घटनेची माहिती समजताच पक्षीमित्र मुकुंद शेटे व प्रवीण जेऊरे, अॅनिमल राहतचे डॉ. राकेश चित्तोडही पोहोचले. या पक्ष्याची पाहणी केली असता त्याला फक्त पायाजवळ किरकोळ जखम झाल्याचे आढळून आले. मात्र तो पक्षी कमालीचा घाबरलेला होता. त्याच्यावर उपचार करून वन विभागाच्या पिंजºयात ठेवण्यात आले. त्याची भीती नाहीशी व्हावी म्हणून पिंजरा चारी बाजूने कापडाने झाकण्यात आला. बुधवार २६ जून दुसरा दिवस उजाडला. सकाळी ९ वाजता डॉ. राकेश चित्तोड, मुकुंद शेटे, वन परिक्षेत्र अधिकारी निकेतन जाधव यांच्या उपस्थितीत ज्या ठिकाणी तो जायबंदी झाला होता तेथे नेऊन या पक्ष्याला निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त करण्यात आले. मुक्तता होताच पक्षी उड्डाण घेऊन समोरील लिंबाच्या झाडावर बसला. सोलापूरकर, वन अधिकारी, पक्षीप्रेमींमुळेच एका जखमी पक्ष्याला पुन्हा जीवदान मिळाले.
सजगता वाढतेय..
- गेल्या काही महिन्यांपासून पक्ष्यांबद्दलची आपुलकी सोलापूकरांमध्ये वाढीस लागल्याचे दिसू लागले आहे. अनेकांनी आपल्या घरासमोर, कॉलनीमध्ये आपापल्या परीने घरटी, धान्य ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे. कुठे एखादा पक्षी संकटात पडला तरी तत्काळ पक्षीप्रेमींना खबर दिली जात आहे. पतंगाच्या मांजात अडकलेल्या राखी धानेश पक्ष्याच्या बाबतीतही कोर्ट कॉलनी परिसरातील लोकांनी दाखवलेल्या माणुसकीमुळेच त्याची सुखरूप सुटका होऊ शकली.