जन्मदात्या मातेचा चेहराही पाहू शकल्या नाहीत; व्हिडिओ कॉलद्वारे अंत्यदर्शन..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 11:49 AM2020-04-09T11:49:27+5:302020-04-09T11:49:27+5:30
आईच्या अंत्ययात्रेत व्हिडीओ कॉन्फरन्सीव्दारे मुलींचा सहभाग; परवानगी काढण्यासाठी धावपळ...!
सोलापूर : ‘ज्या आईने आम्हाला जन्म दिला, आमचे पालन पोशन केले, आम्हाला जगण्याचा मार्ग दाखवला, चांगले संस्कार घडवले, अनेक अडचणीतून मार्ग काढत चांगले शिक्षण दिले, पण आज आमच्यावर इतकी वाईट वेळ आली की शेवटच्या श्वासावेळी ही तिच्याजवळ आम्ही जाऊ शकलो नाही, असे म्हणत मुलींनी हंबरडा फोडला आणि आईच्या अंत्ययात्रेत व्हिडीओ कॉलव्दारे सहभागी झाले.
सोलापूर महानगरपालिकेमधून वरिष्ठ सहाय्यक लिपीक पदावरून निवृत्त झालेल्या विजया शंकर पलवेंचा (वय ६५) यांचे मंगळवार ७ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना अर्चना, शामल, आरती असे तीन मुली आणि एक मुलगा सस्मित पलवेंचा आहेत. दहा वर्षापुर्वीच त्यांच्या पतीचे निधन झाले. यामुळे चारही मुलांचे पालनपोषनाची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. ही जबाबदारी चांगल्या रितीने पार पाडत त्यांनी सर्व मुलांना उच्च शिक्षित केले. सर्व मुलांचे विवाहही झाले. यातील अर्चना यांचे सासर हे आंध्रप्रदेशात आहे तर शामल याचे सासर हे पुण्यात आहे़ आणि आरती यांचे सासर सोलापूरात आहे. मुलगा सस्मित आणि सुन आणि नातवंड हे त्यांच्यासोबत जुळे सोलापूरातील शिवगंगा नगर येथे राहत होते. गेल्या काही दिवसांपासून विजया आजारी होते. त्यांच्यावर औषध उपचार सुरू होता, मागील आठवड्याभरापासून त्यांची तब्येत खूूप खालावली. यामुळे मुलगा सस्मीत याबाबत आपल्या बहीणींना कल्पना दिली. पण सध्या कोरोनाचे सावट देशासह राज्यातही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे घरातुन बाहेर पडू शकत नाही, अशामुळे पुणे येथील आणि आंध्रप्रदेश येथील बहिणी हे आईची काळजी घेण्यासाठी येऊ शकले नाही, यामुळे दररोज ते फोन मधूनच विचारपुस करत होते. अशातच मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास विजया पलवेंचा यांची प्राणज्योत मावळली. ही बातमी जेव्हा सर्व बहिणींना कळाली तेव्हा मात्र त्यांनी हबरडाच फोडला आणि तेव्हापासून ते आईची अंत्ययात्रा होईपर्यत विडीओ कॉलव्दारे जन्मदात्या आईचे शेवटचे दर्शन घेत होते.
घरात आईचे मृतदेह ठेवून अंत्ययात्रेच्या परवानगीसाठी धावपळ सध्या लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. यामुळे अंत्ययात्रेत ही सहभागी होणाºयांवर ही निर्बंध घालण्यात आले आहे, यामुळे सस्मित पलवेंचा यांना आपल्या आई गेल्याचे दु:ख पचवावे लागत होते, तर दुसरीकडे अंत्ययात्रेच्या परवानगीसाठी धावपळ करावी लागली.
आईने अनेक लोकांचे भले केले होते. यामुळे घरात एखादे छोटे कार्यक्रम जरी घेतले तरी शेकडो लोक घरी येत होते, पण आज आई जाताना मात्र काहीच लोक आले होते, याच बरोबर आईचे गेल्याचे दुख तर खुप होते सोबतच मात्र परवानगी घेणे ही गरजेचे होते. ० यामुळे आईचे मृतदेह घरातच ठेवून परवानगी साठी जवळपास दोन तास आमचे गेले, आमच्या परंपरेनुसार आतापर्यंत अग्नी देण्यात येत होते, पण सध्याचा कालावधी बघून त्यांना मशिन मधून अग्नी देण्यात आले.