सोलापूर मनपा प्रशासनाविरुध्द भाजप आक्रमक; गढूळ पाणी पुरवठ्याविरुध्द पाेलिसांकडे तक्रार
By राकेश कदम | Published: May 30, 2024 05:14 PM2024-05-30T17:14:41+5:302024-05-30T17:15:58+5:30
साेलापूर शहरातील मराठा वस्ती परिसरात गेल्या एक महिन्यापासून गढूळ पाणी पुरवठा हाेत आहे.
राकेश कदम, साेलापूर : शहरातील मराठा वस्ती परिसरात गेल्या एक महिन्यापासून गढूळ पाणी पुरवठा हाेत आहे. महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही यात सुधारणा हाेत नसल्याने भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव आणि सहकाऱ्यांनी गुरुवारी थेट पाेलीस ठाणे गाठले. गढूळ पाणी पुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करा, अशी तक्रार दिली.
जाधव यांच्यासह माजी सभागृह नेता संजय काेळी, भाजपचे शहर उत्तर विधानसभा प्रमुख राजकुमार पाटील यांनी जाेडभावी पाेलीस ठाण्यात तक्रार दिली. गेल्या एक महिन्यापासून मराठा वस्ती, घाेंगडे वस्ती, शाहीर वस्ती भागात गढूळ पाणी पुरवठा हाेत आहे.
मनपा अधिकाऱ्यांना यात सुधारणा करण्याबाबत तीनवेळा निवेदने दिली. अधिकाऱ्यांनी जागेवर येउन पाहणी केली. पण पाइप लाइन दुरुस्तीचे काम केले नाही. शहरात पाच दिवसातून एकदा पाणी येते. त्यातही गढूळ पाणी पुरवठा केला जाताेय. हे घाण साठवून ठेवायचे का. अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय यात सुधारणा हाेणार नाही. त्यामुळे या प्रकरणात गुन्हे दाखल करा असा आग्रह या माजी नगरसेवकांनी घेतला. पाेलिसांनी तातडीने कारवाई करू, असे आश्वासन दिले.