पादत्राणे घालून भाजपाने आंदोलन केले म्हणून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:23 AM2021-09-03T04:23:22+5:302021-09-03T04:23:22+5:30
काँग्रेसने केला संत नामदेव पायरीचा अभिषेक पंढरपूर : मंदिरे उघडा, या मागणीसाठी आंदोलन करताना भाजप कार्यकर्त्यांनी चपला व बूट ...
काँग्रेसने केला संत नामदेव पायरीचा अभिषेक
पंढरपूर : मंदिरे उघडा, या मागणीसाठी आंदोलन करताना भाजप कार्यकर्त्यांनी चपला व बूट घालून संत नामदेव महाराजांच्या समाधीस्थळावर धुडगूस घातल्याचा आरोप काँग्रेसने केला. यामुळे संत नामदेव महाराजांच्या पायरीवर (समाधीस्थळा) काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुरुवारी दही, दूध, मध, साखर आणि तूप आदी पंचामृताचा अभिषेक घालून पवित्र स्थळाचे शुद्धीकरण केले.
राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी भाजपने नुकतेच राज्यभर शंखनाद आंदोलन केले. पंढरपूर येथेही श्री विठ्ठल मंदिराजवळ हे आंदोलन करताना कार्यकर्त्यांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने संत नामदेव पायरीवर नतमस्तक होतात, त्या पवित्र ठिकाणावर भाजप कार्यकर्ते पायात चप्पल, बूट घालून चढले, या पवित्र स्थळावर धुडगूस घालत विटंबना केली होती.
यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष समीर कोळी, युवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष शंकर सुरवसे, जिल्हा सरचिटणीस हनुमंत मोरे, अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष अशपाक सय्यद, युवक काँग्रेस कार्याध्यक्ष सागर कदम यांच्यासह सुहास भाळवणकर, मिलिंद अढवळकर, बाळासाहेब आसबे, भाऊ तेलंग उपस्थित होते.
----
जाहीर माफी मागावी
भाजपने संत नामदेव पायरीचे पावित्र्य भंग केले म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने नामदेव पायरीचे शुद्धीकरण करण्यात आले. श्री संत नामदेव महाराज पायरी आणि मंदिर परिसराचे गोमूत्र आणि पंचामृताने शुद्धीकरण करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी आणि आमदारांनी जाहीर माफी मागावी अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा काँग्रेसच्या ओबीसी विभाग व कार्यकर्त्यांनी दिला आहे.
----
फोटो : श्री संत नामदेव पायरीचे शुध्दीकरण करताना काँग्रेसचे पदाधिकारी.