माढ्यात भाजपच्या उमेदवारावर अद्याप शिक्कामोर्तब नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 10:23 AM2019-03-27T10:23:32+5:302019-03-27T10:29:20+5:30
रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आजपर्यंत वेगवेगळ्या नावावर चर्चा सुरू आहे.
सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरण्यास येत्या दोन दिवसात प्रारंभ होईल, मात्र अद्यापही भाजपचा उमेदवार कोण यावर शिक्कामोर्तब होताना दिसत नाही.
रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आजपर्यंत वेगवेगळ्या नावावर चर्चा सुरू आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील हे उमेदवार असणार नाहीत, हे निश्चित झाल्यानंतर कोणाचे नाव समोर येणार याबाबत उत्सुकता आहे. सातारा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या नावावर निश्चिती होण्याची चिन्हे आहेत. त्यांचे नाव भाजपच्या कोअर कमिटीकडे गेले आहे, मात्र भाजपने आपली यादी जाहीर केली नसल्याने हे नाव अद्यापही गुलदस्त्यात राहिले आहे.
माढ्याची जागा भाजपाने अत्यंत महत्त्वाची केली आहे. त्यामुळे या जागेसाठी भाजप अतिशय सावध पावले उचलत आहे. याबाबत स्वत: मुख्यमंत्री या मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील नेत्याशी संपर्क साधून भाजपाला बळकट करण्याची संधी दवडत नाहीत. दोनच दिवसांपूर्वी राजेंद्र राऊत आणि प्रशांत परिचारक यांना मुंबईत बोलावून त्यांनी पवारप्रेमापेक्षा पक्षाकडे अधिक लक्ष द्या, असे सांगितले.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही मंगळवारी संजयमामा शिंदे यांनी गद्दारी केली असून, त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नसल्याचे म्हटले. त्यामुळे माढ्याची जागा कोणत्याही स्थितीत राखायची, या उद्देशाने भाजपने आपली व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून अद्यापही या मतदारसंघात उमेदवाराचे नाव जाहीर झालेले नाही. मात्र येत्या एक ते दोन दिवसात रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे नाव जाहीर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
संजय शिंदे यांची टीका
भाजपचा उमेदवार जाहीर होत नसल्याने आपल्या प्रचारात संजय शिंदे यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. भाजपचा घोळ उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत सुरूच राहणार असल्याचे ते सांगत आहेत.