काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने मारली जोरदार मुसंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 04:32 PM2019-05-24T16:32:10+5:302019-05-24T16:35:04+5:30
सोलापूर लोकसभा निवडणुक ; जयसिद्धेश्वर शिवाचार्यांना मिळाले ३९ हजारांचे मताधिक्य
राजकुमार सारोळे
सोलापूर : काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते. या मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे या दुसºयांदा प्रतिनिधीत्व करीत असताना भाजपने चांगलीच आघाडी घेतली.
नरेंद्र मोदींच्या लाटेचा फटका बसणार नाही असा विश्वास बाळगणारे काँग्रेसचे उमेदवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना शहर मध्य विधानसभा मतदारसंघात चांगलाच फटका बसला. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाºया या मतदारसंघात त्यांची मुलगी आमदार प्रणिती शिंदे या दुसºयांदा प्रतिनिधीत्व करीत असताना भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना या मतदारसंघातून ३९,५०८ इतके मताधिक्य मिळाले आहे.
काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक़ प्रचारात हा मतदारसंघ पिंजून काढला. विविध कामांतून आमदार शिंदे यांनी मतदारांशी सतत संपर्क ठेवला. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसला तारेल असा सर्वांना विश्वास होता. विशेष बाब म्हणजे हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे पण सेना व भाजप नगरसेवकांनी मिळून काम केल्याचा चांगला परिणाम दिसून आला. भाजपपेक्षा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभा या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर झाल्या. पण या मतदारसंघातील राजकीय स्थित्यंतरामुळे मतदारांनी भाजपकडे कौल दिल्याचे दिसून येत आहे.
माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी वंचित बहुजन आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याही या मतदारसंघात प्रचार सभा झाल्या. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, सिनेअभिनेत्री विजयाशांती, मनसेचे नेते राज ठाकरे यांच्या सभा झाल्या. या सभांना झालेली गर्दी मतात परिवर्तीत होऊ न शकल्याचे चित्र दिसत आहे.
या मतदारसंघातील प्रचाराची सर्व यंत्रणा स्वत: आमदार प्रणिती शिंदे यांनी हाती घेतली होती. त्यादृष्टीने त्यांनी नियोजन केले. गृहभेटीवर भर दिला. मोदी सरकारची नोटबंदी, त्यामुळे वाढलेली बेकारी, कामगारांच्या प्रश्नांवर जोर दिला. याचबरोबरीने शहरातील स्थानिक प्रश्नाने मतदारांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. शहरातील पाणीटंचाई, महापालिकेत भाजप सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली तरी विकासकामांकडे झालेले दुर्लक्ष याकडे मतदारांचे लक्ष वेधले. पण तरीही मतदारांनी या प्रश्नांकडे लक्ष न देता भाजपला चांगलीच साथ दिल्याचे मतदानावरून दिसून येत आहे.
या निकालाचा पुढील विधानसभेवर काय परिणाम
२00९ च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अॅड. शरद बनसोडे यांना या मतदारसंघातून ४६ हजार ३८२ तर काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना ५९ हजार ८३९ हजार मते मिळाली होती. शिंदे यांना या मतदारसंघातून १३ हजार ४५७ मतांचे मताधिक्य मिळाले होते. पण यावेळेस शिंदे यांच्या मतामध्ये घट होऊन भाजपचे मताधिक्य वाढले आहे. हा मतदारसंघ भाजप-सेना युती कायम राहिली तर शिवसेनेच्या वाट्याला येणार आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच भाजप-शिवसेना नगरसेवकांनी एकत्रितपणे काम केल्यास बदल होण्याची शक्यता आहे. याचे संकेत मिळाल्याने शिवसेनेच्या गोटात जल्लोष करण्यात येत आहे .