भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या ट्विटमुळे मद्यधुंद एस. टी. चालक अखेर निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 06:10 PM2021-04-07T18:10:04+5:302021-04-07T18:10:34+5:30
नेटिझन्सने केलं असे मजेशीर ट्विट
सोलापूर : भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या ट्विटरमुळे मद्यधुंद एस. टी. चालक बी. आर. आरद्वाड (रा. खेड) यास राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासनाने अखेर निलंबित केले.
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी नुकतेच ट्विट करत ‘बस क्रमांक एमएच-२०/बीएल-३७१५ ही बस सोलापूरहून लातूरकडे निघाली आहे. त्यात बसलेला अतिरिक्त ड्रायव्हर दारू प्यायलेला असून पुढल्या प्रवासात त्याने गाडी चालविणे म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळ आहे’, अशा आशयाचे ट्विट केले होते. एस. टी. प्रशासनाने लगेच त्याची दखल घेत संबंधित एस. टी. चालकावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्रशासनाने ‘त्या’ एस. टी. चालकावर निलंबनाची कारवाई केली. दरम्यान, तो एस. टी. चालक ड्युटी संपल्यानंतर विटा येथे उतरणार होता. पण, तो तेथे न उतरता पुढे लातूरसाठी निघाला व ड्रायव्हरच्या शेजारील सीटजवळ बसला. यावेळी त्याने मद्यप्राशन केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नेटिझन्सने केलं असे मजेशीर ट्विट
चित्र वाघ यांनी ट्विट करताच हा मेसेज अनेकांनी रीट्विट केला. त्यात अनेकांनी त्यात अनेकांनी सोलापूर ते लातूर या १२५ किलोमीटर अंतरासाठी एस.टी. प्रशासनाने दोन चालक ठेवण्याइतके एस.टी.चे उत्पन्न वाढले आहे का, असा प्रश्न उपस्थित केला तर दुसऱ्या नेटिझन्सन म्हणाला, आम्ही नेहमी बसने प्रवास करतो. मला आजपर्यंत एकाही बसमध्ये अतिरिक्त चालक दिसला नाही. मग कधीतरी बसने प्रवास करणाऱ्या ताईनाच कसा दिसला असेल, असा प्रश्न त्याने उपस्थित केला.
प्रशासनाकडून आलेले उत्तर
ही बस खेड आगाराची आहे. खेड ते लातूर यामार्गे चालली होती. या गाडीसाठी जंपिंग चालक देण्यात आलेला होता. मद्यधुंद चालकाने विटा बसस्टँडवरती मद्यप्राशन केले. लातूर बसस्थानकावर बस आल्यावर आगार व्यवस्थापक यांनी सदर चालकाची वैद्यकीय तपासणीकरिता पुढील कारवाई केलेली आहे. याबाबत सविस्तर अहवाल मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठविण्याबाबत संबंधित विभागास सूचित केले आहे, अशी माहिती एस.टी. प्रशासनाकडून देण्यात आली.