बबनराव आवताडे यांच्या मनधरणीसाठी भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:12 AM2021-03-30T04:12:32+5:302021-03-30T04:12:32+5:30
समाधान आवताडे हे कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे निश्चित नव्हते. अशावेळी सिद्धेश्वर आवताडे यांनी आपली उमेदवारी जाहीर करून मंगळवारी ...
समाधान आवताडे हे कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे निश्चित नव्हते. अशावेळी सिद्धेश्वर आवताडे यांनी आपली उमेदवारी जाहीर करून मंगळवारी अर्ज भरण्याची घोषणा केली होती. ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तालुका व शहरातील युवा सहकाऱ्यांच्या भेटी घेऊन निवडणुकीबाबत चर्चाही केली आहे. बबनराव आवताडे यांनी यापूर्वीच मंगळवेढा तालुक्यातील प्रमुख गावांचा दौरा केला असून, कार्यकर्त्यांची मनोगते ऐकून घेतली व निवडणूक लढवावी की नाही, याबाबत चर्चा केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवावी, आम्ही पाठीशी आहोत, असा विश्वास कार्यकर्त्यांनीही त्यांना दिल्याने सिद्धेश्वर आवताडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
आता भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. परंतु, आवताडे गट या निवडणुकीत विभागला जाणार असून, मतांचा फटका बसून सीट धोक्यात येऊ शकते असे पक्षश्रेष्ठींना वाटू लागल्याने त्यांनी या मतदारसंघात अधिक लक्ष घातले आहे. काहीही झाले तरी आवताडे परिवारातील दोन उमेदवार होऊ द्यायचे नाहीत. समाधान आवताडे यांना बबनराव आवताडे यांनी मोठ्या मनाने पाठिंबा द्यावा, असा भाजपचा प्रयत्न आहे. सोमवारी धूलिवंदनाचा दिवस असूनही माजी मंत्री, निरीक्षक व भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ बबनराव आवताडे यांना भेटले. त्यांनी निवडणुकीबाबत चर्चा केली. बंद खोलीत नेमकी कोणती चर्चा झाली, याचा उलगडा झालेला नाही. त्यामुळे उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून, अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशीच बबनराव आवताडे यांची भूमिका समजणार आहे.
------