माढा मतदारसंघात मोदींची सभा घेण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 09:16 AM2019-04-01T09:16:32+5:302019-04-01T09:18:01+5:30
अकलूज की पंढरपूर यावर चर्चा सुरू
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात १० ते १२ एप्रिलदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी सुरू केला आहे. सभेचे ठिकाणी अकलूज असावे की पंढरपूर याबाबतही सर्व्हे केला जात आहे.
भाजपने माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवार आणि रविवारी विविध ठिकाणी सभा घेतल्या. प्रमुख नेत्यांच्या निवासस्थानी बैठका घेतल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मतदारसंघातील घडामोडींचा आढावा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १० एप्रिल रोजी बारामती येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. याच दिवशी माढा लोकसभा मतदारसंघात सभा व्हावी, असा प्रयत्न केला जात आहे.
बार्शी माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेत टेंभुर्णी येथे मोदींची जाहीर सभा व्हावी, अशी मागणी केली होती. पण आता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दौºयावर मोदींची सभा अकलूज किंवा पंढरपूरमध्ये व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
भाजपचे नेते यासाठी सर्व्हे करीत आहेत. लवकरच तारीख आणि सभेचे ठिकाण निश्चित होईल, असे वरिष्ठ नेत्याने सांगितले.