भाजपकडून तब्बल आठ जणांना आमदारकीचे आमिष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:16 PM2019-04-02T12:16:55+5:302019-04-02T12:21:46+5:30
सांगोला येथे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे याच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा मेळावा
सांगोला : भाजपकडून माढा मतदारसंघात नेत्यांचे इनकमिंग जोरदार असले तरी त्याचे मतात रूपांतर होणार नाही, अशी माझी खात्री आहे. कोणाला राज्यपाल, कोणाला राज्यमंत्री तर मतदारसंघात जवळपास आठ विधान परिषदेची आश्वासने देऊन भाजपच्या नेत्यांनी आमिषे दाखवली आहेत, ती खरी होतीलच असे नाही, ती केवळ आश्वासनेच राहतील, असे माढा लोकसभेचे उमेदवार संजय शिंदे यांनी सांगितले.
सांगोला येथे आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी आ. गणपतराव देशमुख होते़ व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, प्रा. पी. सी. झपके, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी झेडपी अध्यक्ष फत्तेसिंह माने-पाटील, जयमाला गायकवाड, निरीक्षक निर्मला बावीकर, सभापती डॉ. श्रुतिका लवटे, उपसभापती शोभा खटकाळे, उपनगराध्यक्षा स्वाती मगर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी पाटील, तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे उपस्थित होते.
जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळून मी वेगळी चूल मांडली होती, याचा अर्थ मी राष्ट्रवादीपासून फारकत घेतली नाही. मी पूर्वीपासूनच शरद पवार यांच्या विचाराला मानणारा कार्यकर्ता आहे. मी जे बोलतो ते स्पष्ट बोलतो. एकदा बोललो की त्याचे काय परिणाम घडतील ती भोगायची तयारी ठेवून वाटचाल करतो. मग त्यात अपयश आले तरी माघार घेत नाही, हा माझा स्वभाव असल्याचे स्पष्ट मत उमेदवार संजय शिंदे यांनी व्यक्त केले.
चंद्रकांत पाटील यांनी भान ठेवून बोलावे: साळुंखे
दीपक साळुंखे म्हणाले की, शरद पवार यांचे राजकारण संपविणार असे म्हणणाºया चंद्रकांत पाटील यांनी बोलताना मर्यादा राखाव्यात. त्यांचे जेवढे वय आहे तेवढी वर्षे खा. शरद पवार यांनी लोकसभा व विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे आपण कोणाविषयी बोलत आहोत याचे भान ठेवावे. पवार यांनी संजय शिंदे यांची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. ज्यांचा पाण्याचा केवळ सकाळी आणि संध्याकाळी संबंध येतो ते लोक आता व्यासपीठावरून पाण्याचं बोलू लागल्याची उपरोक्त टीका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. दीपक साळुंखे यांनी केली.