भाजपा आमदारांसह पंढरपूर मंदिर समितीच्या सदस्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 01:13 PM2020-04-07T13:13:01+5:302020-04-07T13:15:09+5:30
सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई; संचारबंदी काळात विठ्ठलाची पूजा करणे पडलं महागात...!
पंढरपूर : संचार बंदी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन, अधिनियमाचे साथी रोग प्रतिबंधक अधिनियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यात सर्वात मोठी कारवाई पंढरपुरात करण्यात आली आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य तथा भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर व शिवसेनेच्या कोट्यातून झालेले मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्याविरुद्ध पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशासह राज्यामध्ये संचारबंदी लागू आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन भाविकासाठी बंद करण्यात आले आहे. असे असतानाही कोरोना साथीचा रोगाचा प्रादुर्भाव लक्षात न घेता भाजपचे आमदार सुजितसिंह मानसिंह ठाकूर (रा. उस्मानाबाद) व त्यांच्या पत्नी, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे संभाजी शिंदे (राहणार भाळवणी तालुका पंढरपूर) व त्यांच्या पत्नी यांनी चैत्र यात्रेनिमित्त सकाळी साडेपाच ते साडेचार वाजण्याच्या सुमारास श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजा-अर्चा केली.
श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर येथे एकत्र जमून कोरोना विषाणूचा संसर्ग फैलवण्याचा धोका आहे. याची जाणीव असतानासुद्धा श्री विठ्ठल-रुक्मिणीची पूजाअर्चा केली. म्हणून वरील सर्वांविरुद्ध भा.द.वि.का. क. २६९,२७०,१८८ तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ (ब), व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(३)/१३५ तसेच साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ चे कलम २,३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल बालाजी कदम यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.