'मृत्यू जरी झाला तरी माझे अंत्यसंस्कार माळशिरसमध्येच होणार'; विधानसभेसाठी राम सातपुतेंनी दंड थोपटले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 10:00 AM2024-06-23T10:00:59+5:302024-06-23T10:09:53+5:30
Ram Satpue : लोकसभा निवडणुकीत आमदार राम सातपुते यांचा काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी पराभव केला.
Ram Satpute ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत भाजपाच्याराम सातपुते यांचा काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी पराभव केला. आमदार सातपुते यांच्याविरोधात माळशिरसमध्ये मोहित पाटील यांनी जोरदार वातावरण केले आहे. राज्यात काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. काल एका सभेत बोलताना भाजपाचे आमदार राम सातपुते यांनीही विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत. तर कार्यकर्त्यांना भावनिक सादही घातली आहे.
अजित पवारांसोबत युतीवर वंचित बहुजन आघाडीनं सुचवला पर्याय; महायुती फुटणार?
"येणाऱ्या काळात भाजपा निवडणूक हरणार असा प्रचार सुरू केला आहे. पण, एक सांगतो भाजपा कधी निवडणुका हरत नाही. विरोधकांनी लोकसभेत माळशिरस तालुक्यात १ लाख ८० हजारांचं लीड घेणार असं सांगितलं होतं. पण, त्यांना ८० हजारांचा लीडही घेता आलेलं नाही, असा टोलाही मोहिते पाटील यांना आमदार राम सातपुते यांनी लगावला. संविधान बदलण्याचा खोटा प्रचार काँग्रेसने या निवडणुकीत केला. वेगवेगळ्या आंदोलनाचा परिणाम या निवडणुकीत झाला. या निवडणुकीत आपण भरपूर शिकलो आहे, आम्ही आमचा पराभव स्विकारत आहे, असंही राम सातपुते म्हणाले.
"मागची निवडणूक झाल्यापासून मी या तालुक्याची सेवा केली आहे. मीही मुंबईत फ्लॅट घेऊन राहू शकलो असतो. पण मी इकडेच राहिलो. आम्ही सगळं सोडून या तालुक्यात राहिलो, मी तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. तुम्ही माझ्या मागे ताकदीने उभे रहा, येणाऱ्या काळात १०० टक्के महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार आहे. आपण फक्त एक दोन टक्के मतांनी मागे आहे, आता नेत्यांनी तयारी सुरू केली आहे. आपण माळशिरस तालुक्यातही तयारी सुरू करुया, कामाच्या माध्यमातून मी काम करत राहिलो, असंही राम सातपुते म्हणाले.
'माझा मृत्यू जरी झाला तरी माझे अंत्यसंस्कार माळशिरसमध्येच होणार'
"आपल्याला शांतीत क्रांती करायची आहे. आपल्या सगळ्या लोकांना सोबत घेऊ. पुन्हा एकदा तालुक्यात महायुतीचा आमदार देऊ. काही जणांनी माझ्यावर टीका केली, काही जणांनी मला हिणवलं. पण माळशिरस तालुक्यातील जनतेला सांगतो, मागचे पाच वर्षे या तालुक्यातील जनतेची सेवा केली. तुमचा सालगडी म्हणून राहिलो, जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे, जोपर्यंत माझ्या शरिरात रक्ताचा थेंब आहे मी या मातीत गाडून घेईन. तुम्ही कितीही मला पार्सल म्हणून पाठवण्याचा प्रयत्न केला तरीही माझा मृत्यू जरी झाला तरी माझे अंत्यसंस्कार माळशिरसमध्येच होणार, असंही आमदार राम सातपुते म्हणाले.