काँग्रेसच्या पट्ट्यातही भाजपाला पसंती
By admin | Published: May 19, 2014 12:17 AM2014-05-19T00:17:17+5:302014-05-19T00:17:17+5:30
उत्तर तालुका : वडाळ्यात काँग्रेसला अवघे ४१३ मताधिक्य
सोलापूर: मागील काही निवडणुकीत काँग्रेसचा पट्टा म्हणून ओळख असलेल्या तसेच काँग्रेसचे आमदार दिलीप माने यांचे मतदारसंघ व प्राबल्यातील गावातही भाजपानेच मताधिक्य मिळवले आहे. वडाळा गावावर एकहाती सत्ता असलेल्या वडाळा गावातही घसरण झाली असून, काँग्रेसला अवघ्या ४१३ मतांची आघाडी मिळाली आहे. बीबीदारफळ गावाने शिवसेना-भाजपाला आघाडी मिळविण्याची परंपरा कायम राखली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील ४० गावांतील लोकसभा निवडणुकीच्या निकालात उमेदवारांना मिळालेल्या आकडेवारीनुसार ११ गावांत काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांना आघाडी मिळाली आहे. उर्वरित २९ गावांत भाजपाच्या शरद बनसोडे यांना काँग्रेसपेक्षा अधिक मते मिळाली आहेत. भाजपाला बीबीदारफळ, कोंडी व रानमसले या गावांत सर्वाधिक मते मिळाली. काँग्रेसला वडाळ्यात सर्वाधिक ४१३ मते अधिक मिळाली. मोहोळ मतदारसंघाला जोडलेल्या उत्तरच्या २४ गावांमध्ये भाजपच्या बनसोडे यांना १६ हजार ९१८ तर काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांना १२ हजार ५२८ इतकी मते मिळाली आहेत. शिंदे यांच्या पेक्षा बनसोडे यांना ४ हजार ३९० मतांचे मताधिक्य मिळाले आहे. २००९ च्या निवडणुकीत या २४ गावात बनसोडे यांच्यापेक्षा शिंदे यांना ५ हजार ७०० मताचे मताधिक्य मिळाले होते. यावेळी मात्र उलटे चित्र दिसत आहे. उत्तर तालुक्यात अॅड. संजीव सदाफुले यांना सर्वाधिक १०९ मते कोंडी गावात तर बीबीदारफळ गावात ८७ मते मिळाली आहेत. अन्य गावात किरकोळ स्वरुपाची मते मिळाली आहेत.
----------------------
काँग्रेसच्या पट्ट्यात भाजपाची आघाडी ४ तिºहे परिसर हा काँग्रेसचा अन् आमदार दिलीप माने यांचा बालेकिल्ला आहे. आजपर्यंतच्या कोणत्याही निवडणुकीत भाजपा, सेना किंवा राष्टÑवादीने एकत्रित येऊन प्रयत्नांची पराकाष्टा केली तरीही काँग्रेस वरचढ ठरली आहे. परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या उत्तरच्या १० पैकी कवठे व पाथरी या दोन गावांत अन् तेही किरकोळ मताधिक्य काँग्रेसला मिळाले आहे. भाजपाला आठ गावांत काँग्रेसपेक्षा अधिक मते मिळाली आहेत. दहा गावांत भाजपाच्या शरद बनसोडे यांना ५५०३ तर काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांना ४७९७ मते मिळाली आहेत. भाजपाला ८०६ मतांचे मताधिक्य मिळाले आहे.
----------------------------------
वडाळ्यात काँग्रेसला सर्वाधिक मते अनेक वर्षे वडाळ्यातील मतदार काँग्रेस-राकाँच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची घसरगुंडी झाली आहे. काँग्रेसला भाजपापेक्षा अवघी ४१३ मते अधिक मते मिळाली आहेत. बीबीदारफळ गावाने याही निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक मते दिली आहेत. भाजपाच्या बनसोडे यांना काँग्रेसच्या शिंदे यांच्यापेक्षा १२९० मते अधिक मिळाली आहेत.