सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 07:03 PM2018-05-07T19:03:13+5:302018-05-07T19:03:13+5:30
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची तयारी भाजपाच्या गोटात सुरू झाली असून, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी कार्यक्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत निवडणूक अटळ असून, कामाला लागण्याच्या सूचना दिल्या़ पहिल्या टप्प्यात शेतकरी जागृतीवर भर देण्याचा कानमंत्र भाजपा कार्यकर्त्यांना देण्यात आला़
सर्वांची लगीनघाई असतानाही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची तातडीची बैठक संपर्क कार्यालयात बोलावल्याने कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांचा कानोसा घेतला़ निवडणूक लागलीच तर काय राजकीय घडामोडी घडतील, विरोधी गटातील संभाव्य उमेदवार कोण असतील, याची चाचपणी केली़ भाजपा कार्यकर्त्यांनाही कामाला लागण्याचे आवाहन केले़ यावरून बाजार समितीच्या निवडणुका येत्या तीन महिन्यांत पार पडणार हे स्पष्ट झाले़ यापूर्वी शंभुराजे महानाट्याच्या मंडपात अशा प्रकारची बैठक झाली; मात्र निवडणूक लांबल्याने ती बैठक हवेतच विरली़
यावेळी डॉ. चनगोंडा हविनाळे यांनी आगामी दोन महिने खरीप हंगाम सुरू होत असल्याने शेतकºयांसाठी तो महत्त्वाचा आहे़ त्यामुळे ही निवडणूक आणखी काही महिने पुढे ढकलण्याची मागणी केली; मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता ती पुढे ढकलणे शक्य नाही, असे स्पष्टीकरण भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी दिले़ निवडणूक सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आणि शेतक ºयांना न्याय देण्यासाठी लढायची आहे़ सत्तेसाठी एकत्र येणाºया नेत्यांना बाजार समितीपासून दूर ठेवायचे असेल तर शेतक ºयांचा विश्वास मिळवा, केंद्र आणि राज्य सरकारने शेतकºयांसाठी राबवलेल्या विविध योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी गणनिहाय उमेदवारांच्या चाचपणीसाठी तसेच राजकीय परिस्थिती जाणून घेण्यासाठी गावोगावी जाऊन कानोसा घेण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक गटासाठी चार प्रमुख कार्यकर्त्यांचे पथक नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीला भाजपाचे राज्यसभा सदस्य अमर साबळे, सचिन कल्याणशेट्टी, जिल्हा सरचिटणीस हणमंत कुलकर्णी, तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, इंद्रजित पवार, उत्तरचे तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम, शिरीष पाटील, जि. प. सदस्य अण्णाराव बाराचारे, उपसभापती संदीप टेळे, डॉ. चनगोंडा हविनाळे, महादेव कमळे, गुरणा तेली, रामचंद्र होनराव, अनिल बर्वे, पंडितराज कोरे, सिद्धाराम हेले, श्रीशैल माळी, पप्पू सुतार, भारत बिराजदार, बाबा कापसे, माणिकराव देशमुख, भीमाशंकर नरसगोंड आदींसह दोन्ही तालुक्यातील भाजपाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
ई-नाम आणि अडत कपात बंदी
- बाजार समितीच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी तसेच त्यांची होणारी लूट टाळण्यासाठी केंद्र सरकारने ई-नाम योजनेतून देशातील सर्व बाजार समित्या परस्परांना जोडल्या आहेत़ त्यात सोलापूर बाजार समितीचा समावेश आहे़ तिचे महत्त्व शेतकºयांना समजावून सांगा़ राज्य सरकारने शेतीमालावर अडत कपात करण्यास बंदी घातली आहे़ तरीही छुप्या मार्गाने व्यापारी शेतकºयांना लुटतात़ त्यांना कोणाचे संरक्षण आहे़ याचा शोध घेऊन भाजपा कार्यकर्त्यांनी शेतकºयांसमोर ते मांडले पाहिजे़ योजनांची माहिती शेतकºयांच्या घरोघरी पोहोचवा़ म्हणजे काँगे्रसच्या भूलथापांचा उलगडा होईल, असे आवाहन सहकारमंत्री देशमुख यांनी केले़
सर्वांना सोबत घेणार
- बाजार समितीची निवडणूक ही नेत्यांची नव्हे तर कार्यकर्त्यांची असते. या निवडणुकीत राष्ट्रवादी सेना काँग्रेस पक्षातील काही जण सोबत येण्याच्या विचारात असतील तर सर्वांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवू, असे सांगत भविष्यात काहीही होऊ शकते, असे सूचक वक्तव्य भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी केले. विरोधी गटात सारे आलबेल असल्याने थांबा आणि पाहा... अशी गुगली त्यांनी टाकली.