सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षांसह उपाध्यक्षांना हटविण्याचे भाजपचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 10:45 AM2019-08-24T10:45:08+5:302019-08-24T10:58:27+5:30
राजकीय नवी समीकरणे; आमदार म्हेत्रे, डोंगरे, हसापुरे यांच्यासोबत घेतली बैठक
सोलापूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्षच नव्हे तर उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनाही पदावरून हटविण्याच्या हालचाली भाजपने गतिमान केल्या आहेत. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी यासंदर्भात शुक्रवारी एक बैठक घेऊन रणनीती आखण्याची सूचना भाजप नेत्यांना दिली आहे. विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वीच नव्या अध्यक्षाचा निर्णय घेण्यात यावा, असेही या बैठकीत ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे वृत्त शुक्रवारी ‘लोकमत’ने दिले होते. अविश्वास ठराव टाळण्यासाठी झेडपी अध्यक्षांनी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी शुक्रवारी सकाळी फोनवरुन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली. यानंतर आमदार सिध्दाराम म्हेत्रे, जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे, विजयराज डोंगरे यांच्यासमवेत बैठक घेतली.
या बैठकीचा वृत्तांत आमदार प्रशांत परिचारक, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या कानावर घालण्यात आला. परिचारक आणि राऊत यांनी तातडीने कामाला लागू, असे पालकमंत्र्यांना कळविले. अक्कलकोटच्या राजकारणात आगामी दिवसांत उलथापालथ होणार आहे. भाजपने त्यासाठी रणनीती आखली आहे. पण माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचा गट त्याला साथ देत नाही. त्यामुळे केवळ झेडपी अध्यक्ष नव्हे तर उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनाही हटविण्यात यावे, असा सूर अक्कलकोट तालुक्यातील झेडपी सदस्यांनी पालकमंत्री देशमुख, आमदार म्हेत्रे यांच्या कानावर घातला. त्यामुळे पाटील यांनाही हटविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. झेडपी अध्यक्षपदासाठी ज्या ‘मित्राने’ जुळवाजुळव केली होती त्यानेच पुन्हा खटाटोप करावा. विजयराज डोंगरे यांनी जिल्ह्यातील भाजप नेत्यांना नियमित घडामोडींची माहिती द्यावी, असे ठरल्याचे सांगण्यात आले.
पालकमंत्र्यांकडील बैठकीनंतर हसापुरे आणि डोंगरे यांची दुपारी झेडपीत बैठक झाली. या बैठकीत कासेगाव (ता. पंढरपूर) गटाचे सदस्य वसंतराव देशमुख सहभागी झाले होते.
चंद्रकांत दादांना नियमित माहिती कळविणार
लोकसभा निवडणुकीत झेडपी अध्यक्षांनी भाजपची साथ सोडली आणि राष्टÑवादीत प्रवेश केला. हे प्रकरण भाजपच्या जिव्हारी लागले आहे. राज्यातील झेडपी अध्यक्षांना तीन महिने मुदतवाढ देण्यात आली असली तरी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत सत्तांतर घडविण्याची सूचना केली आहे. त्यानुसार आगामी दहा दिवसांत होणाºया घडामोडींची माहिती महसूलमंत्री पाटील यांना कळविण्यात येणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले.