महाराष्ट्रातील सरकार असंवैधानिक: सुब्रमण्यम स्वामी; पंढरपुरातील कॉरिडॉरबाबत मांडली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 08:06 AM2022-12-25T08:06:18+5:302022-12-25T08:06:48+5:30
पंढरपुरातील कॉरिडॉर रोखण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही, असे सांगत सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपवर निशाणा साधला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पंढरपूर : पंढरपुरातील कॉरिडॉर रोखण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही. महाराष्ट्रातील सरकार हे तोडफोड करून बनविण्यात आलेले आहे. ते असंवैधानिक असल्याचे मत भाजपचे खा. सुब्रमण्यम स्वामी यांनी येथे व्यक्त करीत भाजपवर निशाणा साधला आहे.
पंढरपुरात होणाऱ्या कॉरिडॉरच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरची पाहणी करण्यासाठी खा. स्वामी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना स्वामी म्हणाले की, पंढरपूरचा विकास करताना पंढरपुरातील जनतेला विचारायला हवे. मी पाहणी केल्यावर लोकांना पाडकामाबाबत नोटिसा देण्यात आल्याचे समजले. मी वाराणसीची पाहणी केली आहे. वाराणसीच्या तुलनेने पंढरपुरात अर्धा जरी कॉरिडॉर झाला तर मोठे नुकसान होणार आहे.
पाडकाम केल्यास आम्ही त्यांना काही बोलू शकणार नाही. वाराणसी व उज्जैन येथे कॉरिडॉर होताना लोकांनी मला संपर्क केला नाही, त्यामुळे मी त्या ठिकाणी विरोध केला नाही; परंतु पंढरपूरचे लोक माझ्याकडे आले आहेत. यामुळे मी पंढरपुरात होणाऱ्या कॉरिडॉरला विरोध करीत आहे, असेही खा. स्वामी म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"