सोलापूरमध्ये भाजप देणार नवा चेहरा; राष्ट्रवादीचा नेता कमळ चिन्हावर लोकसभा लढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 02:39 PM2024-02-22T14:39:45+5:302024-02-22T14:40:16+5:30

महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये यंदा चुरशीची लढाई होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटल्याने जागावाटपाचं गणितही बदलणार आहे.

BJP will give a new face in Solapur NCP leader will contest solapur Lok Sabha on lotus symbol | सोलापूरमध्ये भाजप देणार नवा चेहरा; राष्ट्रवादीचा नेता कमळ चिन्हावर लोकसभा लढणार?

सोलापूरमध्ये भाजप देणार नवा चेहरा; राष्ट्रवादीचा नेता कमळ चिन्हावर लोकसभा लढणार?

Solapur Lok Sabha ( Marathi News ) : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून गाठीभेटी घेत तिकिटासाठी प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये यंदा चुरशीची लढाई होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटल्याने यंदा जागावाटपाचं गणितही बदलणार आहे. या पार्श्वभूमीवर काही नेते आपला पक्ष सोडून मित्रपक्षाच्या चिन्हावरही निवडणूक लढवू शकतात. सोलापूर लोकसभेतही असंच चित्र पाहायला मिळण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर हे भाजपकडून सोलापूरलोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

उत्तर जानकर यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करत माळशिरस मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना भाजपच्या राम सातपुते यांच्याकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. मागील वर्षी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर उत्तम जानकर यांनी अजित पवार यांची साथ देत महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मागील काही महिन्यांपासून ते लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. जानकर यांच्याकडे एसटीचे प्रमाणपत्रही आहे. धनगर समाजातून येणाऱ्या उत्तम जानकर यांना उमेदवारी दिल्यास भाजपला या मतदारसंघात फायदा होऊ शकतो.

भाजपच्या प्रमुख नेत्यांची घेतली भेट?

सोलापूर लोकसभेच्या उमेदवारीसाठी उत्तम जानकर यांनी नुकतीच मुंबईत भाजपच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. तसंच ते मागील काही दिवसांपासून आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेत निवडणुकीच्या तयारीच्या सूचना देत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे भाजपकडून त्यांना उमेदवारीचा शब्द देण्यात आला आहे का, याबाबतही चर्चा रंगत आहे.

दरम्यान, सोलापूर मतदारसंघातून मागच्या निवडणुकीत डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा विजय झाला होता. मात्र मागील पाच वर्षांत डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी मतदारसंघात म्हणावा तसा जनसंपर्क ठेवला नाही. त्यामुळे भाजपकडून यंदा उमेदवारीसाठी नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे. मात्र उत्तम जानकर यांना आयात केल्यानंतर पक्षातील जुने नेते त्यांची उमेदवारी स्वीकारणार का, हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: BJP will give a new face in Solapur NCP leader will contest solapur Lok Sabha on lotus symbol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.