मोठी बातमी; भाजपा युवा मोर्चाचे पंढरपूर शहरध्यक्षाविरुध्द सावकराकीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 12:27 PM2021-03-06T12:27:37+5:302021-03-06T12:51:38+5:30
४८ चेक, ९ हिशोब वहया, कोरा स्टॅम्प, चेकबुके पोलिसांनी केले जप्त
पंढरपूर : भाजपा युवा मोर्चाचे पंढरपूर शहरध्यक्ष विदूल पांडूरंग अधटराव (रा.संतपेठ, पंढरपूर) यांच्याविरुध्द अवैध सावकराकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या घरझडतीमध्ये एकूण ४८ चेक, ९ हिशोब वहया, कोरा स्टॅम्प, चेकबुके, बॅकपासबुके सह रोख रक्कम २९ हजार ३४० रूपये जप्त करण्यात आले आहेत.
विदूल पांडूरंग अधटराव यांच्याविरुध्द खाजगी सावकाराची तक्रारी पोलिस ठाण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरी तपासणी केली. या तपासणी प्रदिप भानुदास सावंत (सहकार अधिकारी श्रेणी-१ रा.सहा. निबधंक सहकारी संस्था) यांच्या समक्ष पोलिसांनी दस्तऐवजासह रोख रक्कम जप्त केली आहे. विदूल पांडूरंग अधटराव खाजगी सावकार व त्याचे अन्य साथीदार यांचा शोध घेवून त्यांचेकडेही अधिक तपास पोलीस करत आहेत. त्यांचेकडून आणखीन असेच प्रकारचे अवैध सावकारकीचे प्रकार घडले असण्याची अथवा घडत असण्याची शक्यता आहे. पंढरपूर शहर पोलिस ठाणे गु.र.नं. १३५/२०२१ महाराष्ट्र सावकारी (नियमन)अधिनियम २०१४ चे कलम ३९, ४५ सह भा.दं.वि.कलम ५०६ प्रमाणे विदूल पांडूरंग अधटराव यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अतिरीक्त जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत भागवत, पोलीस कर्मचारी गोविंद कामतकर, सुनील पवार, निता डोकडे यांनी केली आहे.