भाजपचा उमेदवार ठरेना, राष्ट्रवादीचा सस्पेन्सही कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:22 AM2021-03-25T04:22:07+5:302021-03-25T04:22:07+5:30
स्वाभिमानीकडून आदी शेतकऱ्यांची देणी द्या, मगच मतांचा जोगवा मागा, अशी घोषणा राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात देत तालुकाध्यक्ष सचिन शिंदे यांनी बुधवारी ...
स्वाभिमानीकडून आदी शेतकऱ्यांची देणी द्या, मगच मतांचा जोगवा मागा, अशी घोषणा राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात देत तालुकाध्यक्ष सचिन शिंदे यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
मागील काही वर्षांपासून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी मतदारसंघात घर घर पिंजून काढले आहे. सर्वसामान्य नागरिकच आपला पक्ष हा अजेंडा राबवत निवडणुकीत त्यांनी आपले सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. त्या निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत बंडखोरी होण्याचे अटळ आहे. ही बंडखोरी थोपविण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते कोणती भूमिका घेतात, कोणाची कशी मनधरणी करतात, यावरच राष्ट्रवादीच्या विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. असे असले तरी राष्ट्रवादीकडून भालके कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी नक्की असल्याचे मानत भगिरथ भालके यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. मात्र राष्ट्रवादीकडून अद्यापही उमेदवारी जाहीर झाली नाही.
भाजपाकडून पहिल्या काही दिवसात निवडणुकीविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली. मात्र राष्ट्रवादीचे नेते येऊन जाताच त्यांनीही आपल्याकडे समाधान आवताडे, आ. प्रशांत परिचारक, उद्योजक अभिजित पाटील, बी. पी. रोंगे आदी मोठे नेते आपल्याकडे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर करून मैदानात उडी घेतली. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून माजीमंत्री राम शिंदे यांच्या नावाची चाचपणी करण्यात आली. असे असले तरी आवताडे, परिचारक की राम शिंदे याविषयी भाजपकडून उमेदवार निश्चित होत नाही. त्यामुळे कोणाची भूमिका काय असणार, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
परिचारक गटाची गुरूवारी बैठक
भाजपकडून आ. प्रशांत परिचारक स्वत: निवडणुकीसाठी इच्छुक असले तरी सध्या भाजपकडून आवताडेंना अनुकूल वातावरण असल्याचे चित्र आहे. त्यामुळे परिचारक गटामध्ये अस्वस्थता आहे. त्याच धर्तीवर युटोपियनचे अध्यक्ष उमेश परिचारक यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष,नगरसेवक, झेडपी, पंचायत समिती, बाजार समिती सदस्यांच्या उपस्थितीत बाजार समितीत महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर गुरूवारी पुन्हा प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होत असून परिचारकांनी गटाचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी निवडणूक लढवावी, असा दबाव कार्यकर्त्यांमधून आहे.
पार्थ पवार, राम शिंदेंच्या चर्चेमुळे संभ्रमावस्था
या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून दिवंगत आ. भालके कुटुंबातील व्यक्ती जवळपास निश्चित मानली जात आहे. तर भाजपकडून समाधान आवताडे किंवा परिचारक यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता असताना भाजपच्या वरिष्ठांकडून या मतदारसंघात असलेले धनगर समाजाचे असलेले प्राबल्य लक्षात घेता माजीमंत्री राम शिंदे व राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्या चर्चेने गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही पक्षांकडून पेरण्यात येत आहे. मात्र याबाबत कोणताही स्पष्ट निर्णय होत नसल्याने मतदारसंघात उमेदवारीबाबत संभ्रमावस्था आहे.