संविधान बदलून हुकूमशाही आणण्याचा भाजपचा डाव : नितीन राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:27 PM2019-04-06T12:27:36+5:302019-04-06T12:39:29+5:30
संविधान बचावासाठी लढा देणे म्हणजे एक दुसरं महायुद्धच होणार असल्याचेही मत काँग्रेसच्या अखिल भारतीय मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष, माजी मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले.
सोलापूर : भारतीय संविधान बदलून देशात हुकूमशाही राजवट आणण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसच्या अखिल भारतीय मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष, माजी मंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी येथे काँग्रेसभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
राऊत यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका केली. भारतात जात, धर्म आणि पंताच्या राजकारणाला थारा नाही पण भाजपकडून या लोकशाहीवर आधारित असलेल्या या देशाचे राजकारण जातीधर्मावर आणण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे संविधान बचावासाठी लढा देणे म्हणजे एक दुसरं महायुद्धच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेस पक्षाने पराभव केला होता अशा अफवा भाजपकडून पसरविल्या जात आहेत. त्यावेळी डॉ. बाबासाहेब हे काँग्रेस पक्षातर्फे निवडणुकीस उभे नव्हते तर ते स्वतंत्र पक्षाकडून उभे होते.
डाव्या विचारसरणीच्या लोकांनी डॉ. बाबासाहेबांना दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळे त्यांचा पराभव झाला. त्यानंतर काँग्रेसने त्यांना राज्यसभा आणि संविधान सभेवर घेतले. त्यावेळी पराभव झाला तरी दगडापेक्षा वीट मऊ म्हणून काँग्रेससोबत राहू, अशी भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतली होती. संविधान बचावासाठी लढणारे लोकच डॉ. बाबासाहेबांचे खरे वारसदार आहेत. भाजपकडून संविधान बदलण्याचा प्रयत्न होत असतानाही केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले त्यांच्यासोबत आहेत. ज्यावेळी त्यांना हे कारस्थान लक्षात येईल त्यावेळी तेही संविधान बचाव लढ्यासाठी उभे राहतील, असा विश्वास राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.