सोलापुरात भाजपचा जल्लोष; महापौरपदी श्रीकांचना यन्नम; उपमहापौरपदी राजेश काळे
By appasaheb.patil | Published: December 4, 2019 04:00 PM2019-12-04T16:00:37+5:302019-12-04T16:11:39+5:30
श्रीकांचना यन्नम यांच्या रूपातून पद्मशाली समाजाला आठव्यांदा महापौर पदाची संधी मिळाली तर यन्नम या पद्मशाली समाजातील पहिल्या महिला महापौर ठरल्या.
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पार्टीच्या श्रीकांचना यन्नम तर उपमहापौरपदीभाजपाचेच राजेश काळे विजयी झाले. श्रीकांचना यन्नम यांच्या रूपातून पद्मशाली समाजाला आठव्यांदा महापौर पदाची संधी मिळाली तर यन्नम या पद्मशाली समाजातील पहिल्या महिला महापौर ठरल्या. निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आवारात एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण, हलग्यांचा कडकडाटाने परिसर दुमदुमुन गेला होता.
सोलापूर महापालिकेत बुधवारी महापौर व उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया पार पडली़ निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी काम पाहिले़ महापौरपदासाठी श्रीकांचना यन्नम यांचा सामना एमआयएम पक्षाच्या शहाजीदाबानो शेख यांच्याशी झाला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच बहुजन वंचित आघाडी अशा एकूण ३९ सदस्यांनी निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली़ यन्नम यांना ५१ तर शेख यांना ०८ मते मिळाली़ त्यामुळे निवडणुक निर्णय अधिकारी प्रकाश वायचळ यांनी महापौरपदी श्रीकांचना यन्नम या विजयी झाल्याचे घोषित केले.
महापौर निवडीनंतर उपमहापौर पदासाठी निवडणुक प्रक्रिया पार पडली़ उपमहापौर पदासाठी एकूण ०९ अर्ज आले होते़ अंतिम सामना भाजपाचे राजेश काळे, काँग्रेसच्या फिरदोस पटेल आणि एमआयएमच्या तस्लिम शेख यांच्यात झाला़ शिवसेनेत या मतदानावेळी फाटाफुट दिसली. गुरूशांत धुत्तरगांवकर आणि देवेंद्र कोठे यांनी मतदानात भाग घेतला नाही़ उर्वरित सेना नगरसेवकांनी काँग्रेस उमेदवारास मतदान केलं. राजेश काळे यांना ५०, फिरदोस पटेल यांना ३४ तर तस्लिमा शेख यांना ८ मतं मिळाली़ १६ मतांनी राजेश काळे विजयी झाले़ वंचितचे तीन आणि माकपचा एक सदस्य तटस्थ राहिला.