मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील निर्णयाविरोधात काळी फीत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:23 AM2021-05-18T04:23:17+5:302021-05-18T04:23:17+5:30
वडवळ: पदोन्नतीच्या कोट्यातील ३३ टक्के आरक्षित पदे मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांनाच पदोन्नती देऊन भरण्याकरिता निर्णय न ...
वडवळ: पदोन्नतीच्या कोट्यातील ३३ टक्के आरक्षित पदे मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांनाच पदोन्नती देऊन भरण्याकरिता निर्णय न घेता पदोन्नतीतील आरक्षित पदे खुल्या प्रवर्गातून सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याच्या शासन निर्णयाविरोधात राज्यात काळी पट्टी बांधून निषेध करण्यात येणार असल्याची माहिती प्रोटॉन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर कांबळे यांनी दिली
राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी शासनास पत्रव्यवहार करून मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांच्या आरक्षित पदाविषयी आग्रही मागणी करण्यात आली होती.
मात्र, ७ मे २०२१ च्या शासन निर्णयाने संपूर्ण पदोन्नतीमधील आरक्षणाची प्रक्रिया खुल्या प्रवर्गातून करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांच्या संविधानिक अधिकारावर ही गदा आली. जातीयवादी षड्यंत्र रचून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर हा मोठा अन्याय केला आहे. याचा तीव्र निषेध १९ मे रोजी राज्यात काळी फीत लावून करणार असून, कोरोना महामारीच्या काळात शासन कोरोना परिस्थितीचा आधार घेऊन वाटेल ते निर्णय घेऊ शकत नसून, रस्त्यावर उतरून आंदोलन करताना कर्मचाऱ्यांना कोरोना महामारीची लागण झाल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
या निवेदनावर संघाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र इंगोले, कार्याध्यक्ष किशोर शिंदे, महासचिव राजेंद्र राजदीप यांच्या सह्या आहेत.