राज्यभरातील अंध संघटनांचे कार्यकर्ते होणार वºहाडी!
By Admin | Published: May 21, 2014 01:27 AM2014-05-21T01:27:57+5:302014-05-21T01:27:57+5:30
विवाहाची उत्सुकता वाढली : अनेकांचे योगदान
सोलापूर : ‘लोकमत’ने राबविलेल्या ‘चला लग्नाला’ सदराचा समारोप पाच अंध बांधवांच्या विवाहाने होणार याचे वृत्त मंगळवारी प्रसिद्ध होताच अंध संघटनेच्या राज्यभरातील प्रतिनिधींनी चौकशी करून विवाहाला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले. दरम्यान विवाह सोहळ्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती व संस्थांनी हात पुढे केला. आसरा चौकातील पंचतारांकित बालाजी सरोवर हॉटेलच्या सभागृहात विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. हळदी व लग्नाची वरात हे कार्यक्रमही लक्षवेधक ठरणार आहेत. वृत्तपत्रात गाजलेल्या एका सदराचा समारोप आगळ्यावेगळ्या उपक्रमाने होत असल्याबाबत अनेकांनी याचे स्वागत केले. विवाह सोहळ्यात सहभागी झालेले बांधव राज्यभरातील आहेत. अंध संघटनेच्या राज्यातील पदाधिकार्यांनी मीडियाने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. ज्यांनी आयुष्यात प्रकाश पाहिला नाही, पण जिद्दीने अंधशाळेत शिक्षण घेऊन भरारी घेण्याची स्वप्ने पाहिली, आता सखीच्या सोबतीने सुखी संसाराची वाटचाल करण्यास उत्सुक असलेल्यांना ‘लोकमत’ने हात दिला. हा योग डोळस माणसांनाही पाहण्यासारखा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय दृष्टिहीन संघ भारतचे पश्चिम विभागीय सचिव प्रभाकर कदम यांनी व्यक्त केली. सोलापूर विद्यापीठातील टेलिफोन आॅपरेटर तुकाराम पवार यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमास व्यापारी, संस्था, व्यक्तींनी मदत केली आहे तर अनेकांनी फोन करून मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. सामाजिक बांधिलकीतून मीडियाने यात पुढाकार घेतल्याचे कौतुक करून उद्योगपती राम रेड्डी यांनी बालाजी सरोवरमधील सभागृह उपलब्ध करून दिले. मनसेचे जिल्हाप्रमुख दिलीप धोत्रे, शिवशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बिज्जू प्रधाने, रोहन गायकवाड, रोहित गायकवाड, मोगले साडी सेंटरचे शिवकुमार मोगले, व्ही. आर. पवार यांच्या सौभाग्य सिल्क हाऊसचे राजेश पवार, नगरसेवक नागेश ताकमोगे, जितू राठी, पवन पाटील, परेश पाटील, सना मुजावर, धनराज गोयल फूट वेअर, सर्वोदय स्टिल सेंटरचे कुशल देढिया, आरटीओतील कर्मचारी संतोष सुरवसे, कस्तुरे असोसिएटचे मनीष कस्तुरे, पटेल फटाका वर्क्सचे एम. ए. पटेल, बी. वाय़ टेलरचे बालाजी यज्जा, अॅड. जयदीप माने, शैला गुड्डापल्ली, धांडेकर कॉटेज, संकेत हॉटेल, आरटीओ अधिकार्यांनी मदतीसाठी हात पुढे केला.
---------------------
या आगळ्यावेगळ्या उपक्रमात अंध वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’चे संपादक राजा माने, सहायक सरव्यवस्थापक रमेश तावडे, नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंडचे संस्थापक प्रकाश यलगुलवार, रोटरी क्लब आॅफ सोलापूर नॉर्थ संचलित भैरूरतन दमाणी अंधशाळेचे अध्यक्ष शिवाजी उपरे, सचिव संतोष भंडारी यांनी केले आहे.