लेकीच्या यशानं भाजी विकणाºया आईच्या डोळ्यात आनंदाश्रू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 03:27 PM2019-06-10T15:27:45+5:302019-06-10T15:29:44+5:30
यशोगाथा; अबोली माळी या विद्यार्थींनीने मिळविले ९१़९० टक्के गुण
महेश कुलकर्णी
कुरुल : मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथील स्व. दाजीकाका गोडबोले विद्यालयाची विद्यार्थिनी अबोली कैलास माळी हिने प्रतिकूल परिस्थितीत चांगला अभ्यास करून ९१.८० टक्के गुण घेत आपल्या आईच्या कष्टाचे चीज केले आहे. तिच्या यशाने भाजी विकणाºया आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळल्या. मार्च २०१९ मध्ये झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
यात एक विशेष गुणवान विद्यार्थिनी म्हणजे जिचे वडील हयात नाहीत आणि जिची आई पाच वर्षांपूर्वी पतीच्या निधनानंतर स्वत:च्या दीड-दोन एकर शेतात दररोज काम करते. गावातील शेतकºयांकडून भाजीपाला विकत घेऊन सोलापुरात विकून चार मुलींच्या संसाराचा गाडा हाकते. ‘कष्ट हेच भांडवल’ मानून धीराने वाटचाल करणारी व खंबीर माता असणारी मंगलताई माळी यांची कन्या अबोली कैलास माळी या विद्यार्थिनीला दहावी परीक्षेत तब्बल ९१.८० टक्के गुण मिळाले आहेत. तिने विद्यालयात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. परिस्थिती माणसाला घडविते. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण यश मिळवू शकतो. आपण खेड्यात राहतो. आपण गरीब आहोत. आपल्याला क्लास नाही, अशी कोणतीही न्यूनगंडाची भावना न बाळगता अभ्यासावर लक्ष केंद्रित केले तर यश हे हमखास मिळतेच मिळते, हे अबोली माळी हिने दाखवून दिले आहे.
कष्टाचं चीज.. मुलीनं नाव केलं
- आपली मुलगी अबोली ही ९१.८० टक्के गुण घेत शाळेत दुसरी आली आहे, हे जेव्हा तिच्या आईला मंगलतार्इंना कळाले, तेव्हा त्यांना आपले आनंदाश्रू आवरता आले नाहीत. त्यांनी आपण तिच्या भविष्यासाठी व शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टाचं सार्थक झाल्याचं समाधान वाटल्याचे सांगितले.