कृषी कायद्याविरोधात म्हैसगाव येथे ‘स्वाभिमानी’चा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:20 AM2021-02-07T04:20:51+5:302021-02-07T04:20:51+5:30
गेल्या ७४ दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे कृषी कायदे रद्द करावेत म्हणून तीव्र आंदोलन सुरू आहे. मात्र, केंद्र सरकारकडून दखल ...
गेल्या ७४ दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे कृषी कायदे रद्द करावेत म्हणून तीव्र आंदोलन सुरू आहे. मात्र, केंद्र सरकारकडून दखल घेतली जात नाही. शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी दुपारी १२ वाजता कुर्डुवाडी बार्शी रस्त्यावरील म्हैसगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने घोषणाबाजी करीत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांतून मोठी घोषणाबाजी झाली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांकडून म्हैसगाव विभागाचे मंडळाधिकारी सचिन मडके यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
आंदोलनात स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अजिनाथ परबत, जिल्हा संघटक सिध्देश्वर घुगे, तालुका अध्यक्ष सत्यवान गायकवाड, प्रकाश खारे, दत्ताभाऊ लोंढे, राजेंद्र शिंदे, हनुमंत भोसले, मोहन दुधाल, संभाजी पाटील, विष्णू दळवी, हरी यादव, रवींद्र चांदणे आदींसह शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.
-----
फोटो ओळ- २६कुर्डुवाडी-रस्ता रोको
कुर्डुवाडी-बार्शी रस्त्यावर शनिवारी म्हैसगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन केले.