डेल्टा प्लसची नाकेबंदी;  सोलापूर जिल्ह्याची सीमा होणार लॉक, रोज होणार तीन हजार चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 04:24 PM2021-08-04T16:24:01+5:302021-08-04T16:24:12+5:30

सोलापूर शहरात मात्र होतेय फक्त मास्कची तपासणी

Blockade of Delta Plus; Solapur district boundary will be locked, three thousand tests will be done daily | डेल्टा प्लसची नाकेबंदी;  सोलापूर जिल्ह्याची सीमा होणार लॉक, रोज होणार तीन हजार चाचण्या

डेल्टा प्लसची नाकेबंदी;  सोलापूर जिल्ह्याची सीमा होणार लॉक, रोज होणार तीन हजार चाचण्या

googlenewsNext

सोलापूर : कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे ग्रामीण भागातील संसर्ग वाढू नये यासाठी जिल्ह्याच्या सीमा लॉक करण्यात येणार आहेत. इतर राज्य व जिल्ह्यांतून येणाऱ्या सुमारे तीन हजार संशयियांतची दररोज अँटिजन टेस्ट करण्याचे जिल्हा आरोग्य विभागाने नियोजन केले आहे.

सोलापूर शहरात जुलैपासून रुग्ण घटले आहेत. मात्र, ग्रामीण भागातील संसर्ग कायम आहे. जिल्ह्यालगतच्या सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग जादा आहे. अनलॉक असल्याने बाधित जिल्ह्यात व्यापार व इतर कामांसाठी ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ग्रामीण भागात गेल्या चार दिवसांत पुन्हा रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ग्रामीण भागात नाकेबंदीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा आरोग्य विभागाने जिल्ह्याच्या सीमेवरील सर्व रस्त्यांवर आरोग्य पथके नियुक्त करण्याचा सोमवारी आदेश दिला आहे. त्याप्रमाणे पोलीस व महसूल खात्यातर्फे नियोजन करण्यात येत असून, सीमेवरून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची थर्मल गनद्वारे टेंपरेचेर व ऑक्सिमीटरतर्फे ऑक्सिजनची तपासणी करण्यात येणार आहे. यात संशयित आढळणाऱ्यांची कोरोना चाचणी केल्यावरच त्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार आहे. दररोज अशा ३ हजार चाचण्या होतील, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे.

कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग

ग्रामीण भागात दररोज ३५० ते ५०० बाधित आढळत आहेत. सांगोला, पंढरपूर, माळशिरस, करमाळा, माढा, बार्शी या तालुक्यांत बाधितांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे संसर्ग कमी करण्यासाठी बाधितांच्या संपर्कातील २५ व्यक्तींचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत; पण प्रत्यक्षात १५ ते १७ व्यक्तींचा शोध होत आहे.

ग्रामीण भागावर अधिक लक्ष

  • १ सध्या ग्रामीण भागात जादा रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले आहे.
  • २ सोलापूर शेजारच्या जिल्ह्यांत संसर्ग अधिक आहे. अनलॉकमुळे लोक ये- जा करीत असल्याने ग्रामीणमध्ये संसर्ग कायम असल्याचा आरोग्य विभागाचा अंदाज आहे.

कोठे काय घेतली जात आहे दक्षता...

बसस्थानक

अनलॉकचा तिसरा स्तर सुरू झाल्यावर प्रवासी बसवाहतूक सेवा सुरू झाली. सुरुवातीला बसमध्ये येणाऱ्यांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात येत होती. आता फिजिकल डिस्टन्सला फाटा मारून फक्त बसचे सॅनिटायझेन व प्रवाशांना मास्क इतकीच दक्षता घेण्यात येत आहे.

रेल्वेस्थाानक

बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल गनद्वारे तपासणी होते. मास्कवर लक्ष ठेवले जाते. सॅनिटायझर फवारणी केली जाते; पण प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चाचणी किंवा लसीकरण झाले आहे काय, याची खातरजमा केली जात नाही.

विमानतळ

सोलापूर शहरात प्रवासी विमानसेवा नाही. सहा सीटर खाजगी विमाने केव्हातरी येतात. त्यांच्यासाठी सर्व तपासणी यंत्रणा विमानतळावर आहे. इतर प्रवाशांची वहिवाट नसल्याने आरोग्य विभागाची यंत्रणा विमानतळावर कार्यरत नाही.

शहरातील एन्ट्री पाॅइंट

सोलापूर शहातील संसर्ग कमी झाला आहे. शहरातून व जवळून तीन महामार्ग जातात. प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असते. बाजारपेठ व प्रमुख रत्यावर पोलीस अचानकपणे मास्कची तपासणी करतात. एन्ट्री पॉइंटवरील तपासणी शिथिल केली आहे.

शहरातील संसर्ग कमी झाला आहे. ग्रामीण भागातील संसर्ग कमी झालेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागात वारंवार रुग्ण आढळून येणाऱ्या भागावर लक्ष केंद्रित केले आहे. या ठिकाणी चाचणी व बाधितांमधील संसर्ग शोधण्याची मोहीम सुरू आहे. जिल्हा सीमेवर नाकेबंदीचा आदेश दिला आहे.

डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा शल्यचिकित्सक

 

Web Title: Blockade of Delta Plus; Solapur district boundary will be locked, three thousand tests will be done daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.