२३ वर्षांमध्ये १८ हजार जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 10:12 AM2019-08-26T10:12:33+5:302019-08-26T10:13:49+5:30
राजस्थानी विकास मंडळाचा उपक्रम; दर स्वातंत्र्यदिनी होतेय शिबीर
सोलापूर : रक्तदानाचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे. मात्र रक्तदानातून सलग २३ वर्षे समाजाची सेवा करणे ही अवघड बाब आहे. राजस्थानी विकास मंडळाने रक्तदानाचा उपक्रम घेत २३ वर्षांत १८ हजार ६७० रक्तदात्यांकडून रक्तसंकलन करत एक वेगळाच आदर्श समोर ठेवला आहे.
यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त घेतलेल्या उपक्रमाचे यंदाचे हे २३ वे वर्ष होते. या शिबिरात ५५१ जणांनी रक्तदान केले. सोलापुरात राजस्थानी विकास मंडळाची स्थापना ७० वर्षांपूर्वी करण्यात आली. राजस्थान येथून सोलापुरात आलेल्या कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकास राजस्थानी विकास मंडळात सहभागी करुन घेण्यात आले आहे. एकत्र राहून समाजोपयोगी काम करण्यासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली. एखादा उपक्रम हाती घेतल्यास तो सतत पुढे चालू ठेवण्यासाठी मंडळाचा प्रयत्न असतो.
असाच रक्तदान शिबीर घेण्याचा हा उपक्रम आहे. दरवर्षी घेण्यात येणाºया या शिबिरात ७० टक्के रक्तदाते हे नेहमीचे आहेत. जे दरवर्षी रक्तदान करतात तर ३० टक्के नव्याने जुळले जातात. रक्तदान करणाºयांमध्ये ४० ते ५० वेळा रक्तदान करणारे अनेक रक्तदाते आहेत. अशा रक्तदात्यांमुळे राजस्थानी विकास मंडळाकडून रक्तदानाची चळवळ सुरु आहे.
गरजू रुग्णांना मदत
राजस्थानी विकास मंडळातर्फे धर्मादाय रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. गरजू रुग्णांना याचा वापर होतो. तसेच काही रुग्णांना रक्ताची पिशवी घेण्याची ऐपत नसते, त्यांनादेखील राजस्थानी विकास मंडळाकडून रक्त घेण्यास सहकार्य केले जाते. एखाद्या गरजूचा जीव वाचला तर यापेक्षा चांगले कार्य असू शकत नाही. यंदा रक्तदान शिबिरास २३ वर्षे पूर्ण झाली आहेत. भविष्यातही हा उपक्रम सुरुच राहील, असा विश्वास विजयकुमार जाजू यांनी बोलून दाखविला.