शस्त्रक्रिया वाढल्या अन् शिबिरांची संख्या कमी झाल्याने सोलापुरात रक्ताचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 11:03 AM2021-09-18T11:03:13+5:302021-09-18T11:03:19+5:30
शस्त्रक्रियांमुळे मागणी वाढली : लसीकरणाचाही परिणाम
सोलापूर : शहर व जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. लसीकरणामुळे अनेकजण रक्तदान करत नाहीत तसेच शिबिरांची संख्याही घटली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शस्त्रक्रिया पुन्हा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे रक्ताची मागणी वाढली असून, तुटवडा निर्माण झाल्याचे रक्तपेढ्यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही महिन्यांपासून कमी झाल्यामुळे रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियांची संख्या वाढली आहे. दरवर्षी गणेशोत्सवात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत नसल्यामुळे रक्तदान शिबिरांची संख्या घटली आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत रक्तदान शिबिरांचे आयोजन तितके होत नाही.
कोविड लसीकरणाचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येते. तरीही अनेकजण हे लसीकरणानंतर रक्तदान करत नाहीत. रक्तपेढीमध्ये मोठ्या मुश्किलीने दर महिन्याला एक हजार रक्त पिशव्यांचे संकलन केले जात आहे, तर मागणी ही दर महिन्याला १,४०० ते १,५०० रक्त पिशव्यांची आहे. पुढील महिना हा रक्तदाता महिना असून, अधिकाधिक दात्यांनी पुढाकार घेऊन आत्तापासून रक्तदान करुन हा महिना साजरा करण्याचे आवाहन रक्तपेढ्यांनी केले आहे.
६० टक्क्यांनी रक्तदान घटले
एखाद्या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले तर तिथे किमान १०० दाते रक्त द्यायचे. आता यात ३० ते ४० टक्क्यांनी घट झाली आहे. पूर्वीप्रमाणे शिबिर होत नसल्यामुळे रक्त संकलन मागणीप्रमाणे होत नाही. त्यात लसीकरणामुळे अनेकजण रक्तदान करत नसल्याचे डॉ. हेडगेवार रक्तपेढीतर्फे सांगण्यात आले.
सर्वच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. डेंग्यूचे रुग्ण वाढल्यामुळे प्लेटलेटही द्यावे लागत आहे. यासाठी दात्यांना फोन करुन संपर्क साधावा लागत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी शासनाने रक्तदाते व आयोजकांसाठी काही सुविधा व सवलती द्यायला हव्या.
- अशोक नावरे, प्रशासकीय अधिकारी, दमाणी रक्तपेढी