आधुनिकीकरणाचा फटका; सोलापुरातील ब्रिटिशकालीन यंत्रमागाची भंगारात विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 10:53 AM2020-02-19T10:53:30+5:302020-02-19T10:55:23+5:30
शटललेस यंत्रमागावर उत्पादन सुरू; काही उद्योजक यंत्रमाग उद्योगातून बाहेर पडताहेत
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : सोलापुरातील टेक्स्टाईल उद्योगात आधुनिकीकरणाचे वारे जोरात वाहताहेत़ब्रिटिशकालीन यंत्रमाग कालबाह्य होत आहेत़ काही यंत्रमाग खराब झाले असून, काहींनी रॅपिअर अर्थात शटललेस यंत्रमागावर उत्पादन सुरू केले़ तसेच काही उद्योजक यंत्रमाग उद्योगातून बाहेर पडताहेत़ या सर्वांचा परिणाम जुने ब्रिटिशकालीन यंत्रमाग भंगारात विकण्याचे प्रमाण वाढले आहे.
मागील पाच ते सहा वर्षांत तब्बल सहा हजार ब्रिटिशकालीन यंत्रमाग भंगारात विकल्याची माहिती सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी दिली़ सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगाला ब्रिटिशकालापासून एक उज्ज्वल असा इतिहास आहे़ ब्रिटिशकालातील मिलमध्ये ब्रिटिश कंपनीतील अधिकाºयांनी बनवलेल्या पॉवरलूमवर कापड उत्पादन होत होते़ स्वातंत्र्यानंतरही त्याच यंत्रमागावर कापड उत्पादन सुरू राहिले़ कालांतराने मिल बंद पडल्या.
मिलमधील जुन्या यंत्रमागात काहीसे बदल करत सोलापुरातील उत्पादकांनी त्याच यंत्रमागावर चादरीचे उत्पादन सुरू केले़ चादरी सोबत टॉवेलचेही उत्पादन मागील पंचवीस ते तीस वर्षांपासून सुरु होतेआता जुने यंत्रमाग कालबाह्य होत आहेत़ उत्पादनाची क्षमता खूप कमी झाली़ ब्रिटिशकालीन यंत्रमागाचा स्पीड प्रतितास शंभर मीटर असून याउलट रॅपिअरचा स्पीड प्रतितास चारशे मीटर इतका आहे़ त्यामुळे रॅपिअर लुमचीही क्रेझ वाढू लागली़ सोलापुरातील ४० टक्के यंत्रमाग उद्योजकांनी रॅपिअर लूमचा वापर सुरू केला आहे़ त्यामुळे त्यांच्याकडील ब्रिटिशकालीन यंत्रमाग ते दुसºया उद्योजकांना विकताहेत़ या उद्योगात काही वर्षांपासून मंदी सुरू आहे़ त्यामुळे जुन्या यंत्रमागांना खरेदी करण्याचे प्रमाण देखील कमी झाले़ आधुनिकीकरण करणाºया उद्योजकांना जुने यंत्रमाग विकण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नाही़ ब्रिटिशकालीन यंत्रमाग तब्बल एक हजार किलो वजनाचे आहेत़ त्यामुळे भंगारात त्यांना चांगला भाव मिळतोय़ जुने यंत्रमाग खरेदी करून त्यावर उत्पादन घेण्याचे धाडस कोणी करेना़.
ब्रिटिशकालीन यंत्रमाग हे १८९० सालापासूनचे आहेत़ हे यंत्रमाग प्लाट व बटर कंपनीचे होते़ याच यंत्रमागांवर सोलापुरातील बहुतांश उद्योजकांनी गेली अनेक वर्षे चादर आणि टॉवेलचे उत्पादन घेतले़ आता हे जुने यंत्रमाग काम करेनात़ त्यात वारंवार दुरुस्त्या निघताहेत़ मागील वर्षभरापासून तब्बल सातशे ते आठशे जुने यंत्रमाग भंगारात विकले गेले आहे़ तर अजूनही काही उद्योजकांकडे ब्रिटिशकालीन यंत्रमाग पडून आहेत़ अजूनही सोलापुरात एक हजारांहून अधिक ब्रिटिशकालीन यंत्रमाग कार्यरत आहेत़ बहुतांश उद्योजकांनी आधुनिकीकरणाचा मार्ग स्वीकारला आहे़ त्यामुळे पुढील वर्षभरात सर्व जुने यंत्रमाग कालबाह्य होतील़
- पेंटप्पा गड्डम
अध्यक्ष, सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघ, सोलापूर