उजनी धरणाच्या निसर्गरम्य परिसरात बोटींवरील हॉटेलिंगला मिळणार चालना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 12:49 PM2021-06-21T12:49:36+5:302021-06-21T12:49:48+5:30
जिल्हाधिकाऱ्यांसोबत आमदारांची बैठक : कोयना अन् तारकर्लीच्या धर्तीवर होणार पर्यटन विकास
भीमानगर : उजनी धरण परिसरातील सौंदर्याचा फायदा करून घेण्यासाठी पर्यटन स्थळ निर्माण करण्याचा निर्णय रविवारी घेण्यात आला. याठिकाणी बोटीवरील हॉटेलिंग, पक्षी निरीक्षण केंद्र आणि उद्याननिर्मिती करण्याबाबतही चर्चा झाली.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी उजनी धरणाला भेट देऊन बोटीतून पाहणी केली, तसेच उजनी शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चाही झाली. कोयना अन् तारकर्लीच्या धर्तीवर या ठिकाणी पर्यटन विकास होण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचाही निर्णय घेतला गेला.
या बैठकीत आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, सोलापूर वन विभागाचे उपसंचालक तथा जिल्हा वन अधिकारी धैर्यशील पाटील, माढा प्रांत अधिकारी ज्योती कदम, सोलापूर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, जलपर्यटन तज्ज्ञ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे डॉ. सारंग कुलकर्णी, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, तहसीलदार राजेश चव्हाण, पाणस्थळ विकासचे सल्लागार तथा भारतीय वनसेवा अधिकारी जयंत कुलकर्णी, पक्षी निरीक्षक डॉ. व्यंकटेश मेतन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उबाळे, डॉ. प्राची मेहता, सचिन लोकरे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. सारंग कुलकर्णी व जयंत कुलकर्णी यांनी उजनी धरण परिसरातील प्रस्तावित प्रकल्पाबाबत वेगवेगळ्या स्लाइड शोचे सादरीकरण केले. यावेळी त्यांनी सांगितले की, रोजगारनिर्मिती व्हावी, गर्दी वाढावी, खाजगी उद्योग आणि रोजगार यांचा ताळमेळ घालून उजनी परिसराचा विकास झाला पाहिजे त्यासाठी उजनी धरणावरील पर्यटन क्षेत्राला लवकरात लवकर डेव्हलप करणे गरजेचे आहे. सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संजयमामा शिंदे आणि टीमसोबत बोटीमध्ये बसून पाहणी केली.
स्थानिकांना रोजगार मिळेल...
उजनी जलाशयावर वर्षभर वेगवेगळ्या खंडातून पक्षी येत असतात. यामुळेदेखील पर्यटन व्यवसाय वाढेल, तसेच राष्ट्रीय महामार्गावर उजनी धरण असल्याने हॉटेलिंग व्यवसायही निसर्गरम्य वातावरणात नावारूपाला येईल. रोजगारात वाढ होईल व संबंधित विभागाला पर्यटनाच्या माध्यमातून महसूल गोळा होईल, असे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले.
जागेबाबत लवकरच आराखडा
लवकरच उजनी धरण पर्यटन विकास समिती नेमून जागेची निवड केली जाईल. बाग अन् बोटिंगसाठी निश्चित स्थळाबाबतचा आराखडा फायनल केला जाईल, असे धरण व्यवस्थापन विभागाने सांगितले.
तारकर्ली समुद्र किनाऱ्यावरील स्कुबा केंद्रांचीही इथे निर्मिती करता येऊ शकते. जलाशयात बुडालेली इतिहासजमा गावं पाहण्याचीही लोकांना उत्सुकता आहे. पाण्यातील मासे दर्शनही पर्यटकांना नक्कीच आवडेल.
- संजयमामा शिंदे, आमदार