गाजावाजा करीत बोटिंग चालू झाली, जलपर्णीच्या नावाखाली हळूच बंद पडली; सोलापूर महानगरपालिकेचे दुर्लक्ष
By Appasaheb.patil | Published: January 5, 2023 12:34 PM2023-01-05T12:34:50+5:302023-01-05T12:35:42+5:30
कारंजेही झाले बंद; कोट्यवधी रुपयांचा खर्च जातोय पाण्यात
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : आठ कोटी रुपये खर्च करूनही विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी तलावातील जलपर्णी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दरम्यान, या वाढत्या जलपर्णीमुळे बोटिंग बंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जलपर्णी काढण्याविषयी आयुक्त शीतल तेली-उगले यांनी यापूर्वीच सांगितले होते. मात्र, महापालिकेचे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याची बाब उघड होत आहे.
दरम्यान, कोट्यवधी रुपये खर्च करून छत्रपती संभाजी तलावातील गाळ व जलपर्णी काढण्यात आली होती. त्यानंतर पर्यटनवाढीच्या दृष्टीने १९ ऑक्टोबर २०२२ रोजी बोटिंगची सुविधा सुरू करण्यात आली. या सुविधेचा उद्घाटन सोहळा चांगला थाटामाटात करण्यात आला. मात्र, जलपर्णी वाढल्यामुळे बोटिंग चालिवण्यास अडचण येत असल्याने ठेकेदाराने बोटिंगच बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तलावासमोर बोटिंग सेवा बंद करण्यात आल्याचा बोर्डही लावला. एवढेच नव्हे तर कोट्यवधी रुपये खर्च करून विविध कामे करण्यात आली. बसविलेले कारंजेही बंद पडले. या कामात भ्रष्टाचार झाल्याचा संशय येत असल्याने आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने ‘लोकमत’शी बोलताना केली आहे.
टेंडर काढायचं काय झालं?
जलपर्णी वाढत असल्याबाबतच्या तक्रारी वाढल्या होत्या. शिवाय काही संघटनांनी आंदोलनही केले होते. त्यानंतर आयुक्त शीतल तेली-उगले यांनी संबंधित विभागाला तात्पुरत्या स्वरूपात जलपर्णी काढण्यासाठी तातडीने टेंडर काढण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, त्यानंतर संबंधित विभागाकडून कोणत्या प्रकारच्या हालचाली दिसून आली नाही.
जलपर्णीमुळे परिसरात दुर्गंधी...
वाढत्या जलपर्णीमुळे पुन्हा या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सैनिकनगर, वसंतनगर, पोस्टल कॉलनी, जवाननगर या भागांतील नागरिकांचे आराेग्य धोक्यात आले आहे. वारंवार सांगून, लेखी निवेदन देऊनही महापालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.
जलपर्णी काढण्याविषयी आम्ही आंदोलन केले
जलपर्णी काढण्याविषयी आम्ही आंदोलन केले. अतिरिक्त आयुक्तांना निवेदनही दिले होते. त्यानंतर आयुक्तांनी आमच्या मागणीचा विचार करीत संबंधित विभागाला सूचनाही दिल्या होत्या. तरीही प्रशासनाकडून कोणतेच काम करण्यात आले नाही. पुन्हा जलपर्णी वाढल्यामुळे बोटिंग बंद करावी लागली, हे आपले दुदैव आहे. पुन्हा आंदोलन करणार. -श्याम कदम, संभाजी ब्रिगेड, सोलापूर.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"