भीमा नदीत बुडालेल्या चौघांचेही मृतदेह लागले हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:17 AM2021-05-31T04:17:24+5:302021-05-31T04:17:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : काल शनिवारी दुपारी भीमा नदीच्या पात्रात बुडालेल्या तीन मुली आणि एका मुलाचा मृतदेह आज ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : काल शनिवारी दुपारी भीमा नदीच्या पात्रात बुडालेल्या तीन मुली आणि एका मुलाचा मृतदेह आज दुपारनंतर सापडले. तब्बल २० तास शोधकार्य सुरू होते.
शनिवारी दुपारी वडील शिवाजी तानवडे यांच्यासोबत पोहायला नदीवर गेलेल्या त्यांच्या समीक्षा (वय १३) आणि अर्पिता (वय ११) या दोन मुली तर त्यांचे मेहुणे शिवानंद पारशेट्टी यांची मुलगी आरती (वय ११) आणि मुलगा विठ्ठल (वय १०) भीमा नदीच्या पात्रात बुडाले होते. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतः शिवाजी तानवडे हेदेखील बुडाले. आरडाओरड ऐकून धावत आलेला मेहुण्याचा मुलगा अप्पू पारशेट्टी याने शिवाजीला कसेबसे बाहेर काढले पण डोळ्यांदेखत चारही मुले खोल पाण्यात बुडाली.
शनिवारी ग्रामस्थांनी नदीपात्रात शोधाशोध केली, परंतु रात्री जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने शोधकार्य थांबवावे लागले. या घटनेची माहिती मिळताच मंद्रूपच्या अप्पर तहसीलदार उज्ज्वला सोरटे आणि मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन थेटे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नदीकाठच्या गावातील मच्छिमार आणि जलतरणपटूंना मदतीसाठी बोलावून घेतले. रात्री उशिराने सांगली येथील आयुष हेल्पलाईन बचाव पथकाला पाचारण केले. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सांगलीहून दोन सर्पमित्र आणि चार जलतरणपटू अशा सहा जणांचे पथक दाखल झाले.
सकाळी ६ वाजल्यापासून पुन्हा शोधकार्य सुरू झाले. स्थानिक मच्छिमारांनी नदीत उड्या घेतल्या. प्रवाहाबरोबर अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत शोध घेऊनही मृतदेह हाती लागले नाहीत. घटनेनंतर तब्बल वीस तासांनी समीक्षा आणि अर्पिता या दोन बहिणींचे मृतदेह सादेपूर येथील मच्छिमार मानसिंग भोई याच्या हाती लागले. त्याने त्या दोघींना अलगदपणे पाण्यातून उचलले. त्यानंतर त्याच ठिकाणच्या जवळ आरती पारशेट्टी हिला बाहेर काढण्यात आले. विठ्ठलचा मृतदेह उशिराने बोटीच्या सहाय्याने सांगलीच्या बचाव पथकाने बाहेर काढला.
----
दोघी बहिणींची घट्ट मिठी तशीच
पाण्यातून बाहेर काढताना मच्छिमार मानसिंग भोई याला मृतदेह वजनदार वाटला. त्याने इतरांच्या मदतीने बाहेर काढला. तेेव्हा समीक्षा आणि अर्पिता यांनी एकमेकींना हातापायांनी घट्ट मिठी मारली होती. ती मिठी सोडवून दोघींना बाहेर काढताना उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला.
-------------
बुडालेल्या जागीच खोल पाण्यात मृतदेह
मच्छिमार आणि सांगलीचे बचाव पथक विस्तीर्ण पसरलेल्या नदीच्या पात्रात मृतदेहांचा शोध घेण्यासाठी नदीच्या उताराच्या बाजूने डुंबत होते. पण मच्छिमार मानसिंग भोई हा घटना घडली त्याच ठिकाणी घुटमळत राहिला. ज्या ठिकाणी ही चारही मुले नदीत बुडालेली होती त्या ठिकाणीच सापडली. प्रवाहाबरोबर वाहून गेली असावीत, हा अंदाज निरर्थक ठरला.
वाळूउपसा आणि विद्युत मोटारी बसवण्यासाठी नदीपात्रातील मोठ्या खड्ड्यांनी या अजाण बालकांचा बळी घेतला.
---------
एकाच दिवसात घर उजाड
माझ्या मागे चारही मुले नदीकडे आली. त्यांना वारंवार हाकलून दिले. तरी दुसऱ्या मार्गाने परत आलीच. कडेला पोहण्याचा त्यांचा हट्ट असल्याने मी कानाडोळा केला. काही मिनिटांत चौघेही बुडताना मी पाहिले. त्यातील दोघांना कसेबसे कडेला आणून सोडले. अन्य दोघांना काढण्यासाठी बुडून त्यांनाही केसांना धरून खेचत असताना कडेला सोडलेले दोघे बुडत होते. त्यांना पाहून माझा धीरच सुटला. हातातून दोन्ही मुली निसटल्या. ओरडण्याच्या आवाजाने धावलेल्या पुतण्याने मला बाहेर काढले. आता जगून तरी माझा काय उपयोग? एका दिवसात माझं गोकुळ असलेलं घर उजाड झालं की हो .... असा आक्रोश करीत मृत मुलींचे वडील शिवाजी तानवडे यांनी टाहो फोडला.
-------
कार्यात प्रशासन अग्रभागी
घटनेनंतर प्रशासकीय अधिकारी लवंगी येथील घटनास्थळी धावले. अप्पर तहसीलदार उज्ज्वला सोरटे सहायक पोलीस निरीक्षक नितीन थेटे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे चंद्रकांत हेडगिरे, नायब तहसीलदार प्रवीण घम हे ठाण मांडून होते. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे यांनी रात्री घटनास्थळाला भेट दिली तर प्रांताधिकारी दीपक शिंदे सकाळपासून नदीकाठावर मदत कार्य हाताळत होते. आमदार सुभाष देशमुख यांनी दुपारी तानवडे आणि पारशेट्टी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
------
एकाच चितेवर दिला अग्नी
या घटनेची फिर्याद मृत मुलींचे वडील शिवाजी तानवडे यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले. शवविच्छेदन झाल्यानंतर चारही मृतदेहांना एकाच चितेवर अग्नी देण्यात आला
-----------
फायबर बोट आली कामी
अप्पर तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांनी नदीकाठच्या गावातून बोटींचा शोध घेतला. तेलगाव येथे असलेली लाकडी बोट होऊन कुजल्यामुळे ती वापरण्यायोग्य नसल्याचे सांगण्यात आले. हत्तरसंग संगमातील फायबर बोट ट्रकमधून आणली. या एकाच बोटीच्या साहाय्याने शोधकार्य करावे लागले. ती बोट हाकणारे प्रशिक्षित नावाडी मिळाले नाहीत. सांगलीच्या बचाव पथकातील सदस्यांनी नावेच्या मदतीने शोध घेतला.
--------
परिसरातून धावले मदतीला
पाण्यात बुडालेल्या मुलींच्या शोधासाठी लवंगी ग्रामस्थ कालपासून नदीकाठावर होते. सरपंच संगमेश बगले-पाटील यांनी तरुणांच्या मदतीने स्वतः शोधकार्य हाती घेतले. आप्पासाहेब पाटील (लवंगी), चंद्रकांत खुपसंगे (सादेपूर), डॉ. चनगोंडा हाविनाळे (बरूर), यतीन शहा (भंडारकवठे), हणमंत कुलकर्णी (माळकवठे) यांनी मदतीसाठी धाव घेतली.