पावसात ओढ्यात वाहून गेलेल्या त्या बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह सापडला चिलारीच्या झुडूपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:16 AM2021-06-05T04:16:49+5:302021-06-05T04:16:49+5:30
करमाळा येथील कुंभारवाड्यातील ओढ्याच्या पुलावरून बुधवारी सायंकाळी झालेल्या पावसात पाय घसरून सूर्यकांत मंडलिक पडले होते. पडलेल्या ...
करमाळा येथील कुंभारवाड्यातील ओढ्याच्या पुलावरून बुधवारी सायंकाळी झालेल्या पावसात पाय घसरून सूर्यकांत मंडलिक पडले होते. पडलेल्या ठिकाणापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर त्यांचा मृतदेह सापडला. ओढ्यातील दोन पूल ओलांडून ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत आले.
कुंभारवाडा येथील पुलाच्या वरच्या बाजूला ते ओढ्यात पडले होते. तेथून स्मशानभूमी येथील पुलाखालून पाण्याच्या प्रवाहात ते खाली गेले. मंडलिक गायब झाल्याचे समजल्यानंतर करमाळा पोलिसात गुरुवारी त्यांच्या मुलाने तक्रार दिली होती. गुरुवारी नगरपालिकेच्या वतीने संबंधित व्यक्तीचा शोध सुरू केला होता. नगराध्यक्ष वैभव जगताप व मुख्याधिकारी वीणा पवार यांच्यासह नगरसेवक राजू आव्हाड आदींनी घटनास्थळाला भेट दिली. तत्काळ यंत्रणेला सूचना देऊन जेसीबी व पोकलेनच्या साह्याने दुसऱ्या दिवशी शोध घेण्यात आला.
----
कार्यकर्तेही उतरले ओढ्यात
नगरपालिकेची यंत्रणा तपास करत असताना दुसरीकडे कार्यकर्ते तपासासाठी ओढ्यात उतरले. शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून तपास सुरू होता. त्यानंतर रिपाइंचे नागेश कांबळे, लक्ष्मण भोसले, सुहास ओहोळ, मातंग एकता आंदोलनाचे युवराज जगताप, शरद पवार, राहुल मंडलिक, आनंद करंडे, नाताजी मंडलिक, अनिकेत शिंदे, बाबा करंडे, सुधीर मंडलिक, शेखर मंडलिक, महादेव मंडलिक, संतोष मंडलिक, विनायक आगलावे, सुनील करंडे, भय्या कांबळे, नंदू कांबळे, प्रफुल्ल पटेल, प्रफुल्ल दामोदरे आदी युवकांनी ओढ्यातील चिखल व पाण्यात उतरून पहाटेपासून शोध घेऊ लागले. पाण्यात पडलेल्या ठिकाणापासून शोध सुरू करताना वखार महामंडळाच्या गोडाउनमागे बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह सापडला. रुग्णवाहिकेतून करमाळा उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह नेण्यात आला. यावेळी पोलीस व नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
----
मदतीचे आवाहन
सूर्यकांत मंडलिक यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आहेत. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने आपत्कालीन निधीतून त्यांच्या कुटुंबीयांना मदतनिधी द्यावा, अशी मागणी रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश कांबळे व दलित सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण भोसले यांनी तहसीलदारांना केली आहे.
----०४करमाळा०१, ०२