सोलापूर : बोगस डॉक्टर करताहेत जनावरांवर उपचार, जिल्हा परिषदेचा असणार वॉच
By शीतलकुमार कांबळे | Published: June 7, 2023 12:26 PM2023-06-07T12:26:22+5:302023-06-07T12:28:13+5:30
पशुसंवर्धन विभागाला माहिती देण्याचे आवाहन
सोलापूर : जिल्ह्यात जनावरांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर पशुसंवर्धन विभागाची नजर राहणार आहे. बोगस डॉक्टर आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिली.
पशुवैद्यकीय प्रमाणपत्र नसताना काहीजण जनावरांचा डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करीत आहेत. ग्रामीण भागातील पशुपालक हे डॉक्टरांविषयी माहिती जाणून न घेता त्यांच्याकडून आपल्या जनावरांवर उपचार करवून घेतात. त्यामुळे जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग अशा डॉक्टरांवर वॉच ठेवणार आहे. जिल्ह्यात जनावरांचा बोगस प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आढळल्यास जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन संदीप कोहिनकर यांनी केले.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी यांनी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी यांची मंगळवारी जिल्हा परिषदेत बैठक घेतली. यावेळी त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
ग्रामपंचायतीस हजेरी बंधनकारक
जिल्ह्यात कित्येक पशुवैद्यक हे नियुक्त केलेल्या ठिकाणी सेवा न देता इतरत्र जात असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे आल्या आहेत. या तक्रारींची दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली आहे. आता प्रत्येक पशुवैद्यकीय डॉक्टरांना आठवड्यातून एकदा ग्रामपंचायतीमध्ये हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.