‘संचारबंदी’त बोगस पासचा फंडा; बनावट पास जप्त, पंढरीत दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 04:02 PM2020-04-30T16:02:27+5:302020-04-30T16:04:23+5:30
'कलर झेरॉक्स'वाल्याच्या घरात प्रिंटिंग; भाजीवाला हुडकायचा ग्राहक
पंढरपूर : संचारबंदीच्या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणाºया लोकांना शासनाकडून पास देण्यात आलेले आहेत. परंतु या अत्यावश्यक सेवा पासची प्रति तीनशे रुपयांप्रमाणे विक्री करण्याचे काम दोन बहाद्दरांनी केले आहे.
सोलापूरमध्ये २३ मार्चपासून संचारबंदी करण्यात आली आहे. तेव्हापासून अनेक जण घरात बंदिस्त आहेत, तर अनेक जण अनेक निमित्त करून घराबाहेर पडण्याचे बहाणे शोधताहेत. अशा रोज शेकडो लोकांवर कारवाई करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
शहरात जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा करणाºया लोकांना नगरपालिका प्रशासनाकडून पास देण्यात आले आहेत. त्याचबरोबर नगरसेवक व त्यांचे पाच स्वयंसेवक यांनादेखील पास देण्यात आले आहेत.
अत्यावश्यक सेवा देणारे लोक निर्भीडपणे बाहेर पडत असल्याचे पाहून पंढरपुरातील दोन बहाद्दरांनी नवा फंडा काढत... अत्यावश्यक सेवेच्या पासची विक्री करण्याचा नवा धंदा सुरू केला आहे.
सूरज मनोहर जाधव (वय ३०, महावीर नगर, पंढरपूर) हा त्याच्या घरी असलेल्या कलर प्रिंटरच्या माध्यमातून नगरपालिका प्रशासनाचे बनावट पास तयार करत असे. त्या पासला प्रत्येकी ३०० रुपयांप्रमाणे ग्राहक शोधण्याचे काम उमेश मोहन छत्रे (रा. महावीर नगर, पंढरपूर) करत होते.
या दोघांकडून पास घेऊन अंबादास रामकृष्ण सुरवसे हे भाजी विक्रेते पासची विक्री करत होते. यादरम्यान कोरोना नियंत्रण पथकातील नगरपरिषदेचे वरिष्ठ लिपिक चिदानंद सर्वगोड, अतिक्रमण विभागाचे दत्तात्रय होटकर यांनी सुरवसे यांच्या पासची तपासणी केली. यावेळी त्यांना हे पास बनावट असल्याचे लक्षात आले.
त्या परिसरात पेट्रोलिंग करत असलेले पोलीस कॉन्स्टेबल वीरचंद हजारे व पोलीस नाईक धनंजय जाधव यांच्या मदतीने बनावट पास तयार करणाºया दोघांच्या घरी जाऊन छापा टाकला व त्यांच्याकडून पास व कलर प्रिंटर ताब्यात घेण्याची कारवाई नगरपरिषदेचे वरिष्ठ लिपिक चिदानंद सर्वगोड यांनी केली आहे.
दहा बनावट पास जप्त
- पंढरपूर नगरपरिषदेच्या पथकाने दहा बनावट पास जप्त केले आहेत. आणखी किती लोकांना पास विक्री केली, याबाबत शोध घेण्याचे काम पोलीस यंत्रणेमार्फत होणार आहे. तसेच बनावट पास बनवणाºया दोघांविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.