मोठी बातमी! बॉण्ड पेपर लिहून द्यावं लागणार; तरच क्रिकेटसाठी मैदान मिळणार, इंदिरा गांधी स्टेडियमचे बुकींग झाले ऑनलाइन
By Appasaheb.patil | Published: June 21, 2023 07:09 PM2023-06-21T19:09:26+5:302023-06-21T19:09:34+5:30
शहरातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इंदिरा गांधी स्टेडियम (पार्क) चे मैदान क्रिकेट स्पर्धेसाठी देण्यात येत आहे.
सोलापूर: शहरातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इंदिरा गांधी स्टेडियम (पार्क) चे मैदान क्रिकेट स्पर्धेसाठी देण्यात येत आहे. या मैदानावर सामने अथवा स्पर्धा घ्यावयाची असल्यास आता संयोजकास ऑनलाइन बुकींगची सोय महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान, बॉण्ड पेपरवर हमी पत्र लिहून दिल्यावरच मैदान खेळासाठी मिळणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून इंदिरा गांधी स्टेडियम येथे पहिल्या टप्प्यात मैदानावरील ११ मुख्य खेळपट्टया तसेच ६ सराव खेळपट्टया तयार करण्यात आल्या आहेत. या मैदानावर पॅव्हेलियन इमारत, पंचकक्ष, व्ही.आय.पी कक्ष आणि माध्यम कक्ष ही तयार करण्यात आले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आय.पी.एल अथवा रणजी सामने भरवण्याची सोय झाली आहे. इंदिरा गांधी स्टेडियम (पार्क मैदान ) हे क्रिकेट स्पर्धेसाठी मैदान उपलब्ध करून देण्यात आले असून त्यासाठी आता ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे.
असे आहे मैदानाचे भाडे...
क्रिकेट मैदान बुकिंग करण्याकरिता लेदर बॉल शनिवारी व रविवारी असल्यास प्रति दिवस १३ हजार रूपये अधिक जीएसटी, तसेच लेदर बॉल सोमवार ते शुक्रवार प्रति दिवस ९ हजार अधिक जीएसटी भरावे लागणार आहे. तसेच पाच दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस क्रिकेट मैदान बुकिंग केल्यास लेदर बॉल साठी सोमवार ते रविवार ७ हजार अधिक जीएसटी भरावे लागणार आहे.
असे करा ऑनलाइन बुकींग...
टूर्नामेंट स्पर्धेसाठी मैदान बुक करावयाच्या झाल्यास कमीत कमी पाच दिवस बुकिंग करावा लागेल. अर्जदाराने मैदान बुकिंग हे महापालिकेच्या वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने करणे आवश्यक आहे. तसेच मैदान बुकिंग करतेवेळी विहित नमुन्यातील हमीपत्र ऑनलाइन अपलोड करणे आवश्यक आहे. त्यासाठीचे आवश्यक ते कागदपत्रे आपल्याला ऑनलाईन भरावे लागणार आहे. बुकिंगचे भाडे ऑनलाईन पद्धतीने भरणे गरजेचे आहे. तसेच ऑनलाईन बुकिंग सामन्याचे तारखेच्या एक वर्ष आधीपासून करता येईल.