साखरपुडा अन् लग्न समारंभातून मिळालेल्या देणग्यातून आणली पुस्तके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 12:03 PM2019-12-04T12:03:24+5:302019-12-04T12:05:25+5:30
सोलापुरातील पूर्व विभाग वाचनालय स्थापना दिन विशेष; पुंजाल यांच्याकडून आठवणींना उजाळा
सोलापूर : जवळपास अर्धशतकापूर्वी पूर्व भागातील श्रमिक अमराठी वाचकांना वर्तमान पत्रे आणि ग्रंथ विकत घेऊन वाचणे अशक्य होते़ विणकर श्रमिकांना वाचनाची भरपूर भूक होती़ याच तळमळीतून येथील तेलुगू विणकर नेत्यांनी ४४ वर्षांपूर्वी सार्वजनिक वाचनालय काढण्याचा संकल्प केला़ वाचन यज्ञाचे बीज रोवणे महाकठीण होते़ संकल्पापुढे काही कठीण नसते, या युक्तीप्रमाणे येथील विणकरांनी दारोदारी जाऊन मदतनिधी गोळा केला.
लग्न आणि साखरपुडा समारंभात जाऊन झोळी पसरवली़ लोकांनीही सढळ हाताने देणग्या दिल्या़ श्रमिकांनी दिलेल्या याच देणग्यातूनच विणकरांनी पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाची स्थापना केली, अशा आठवणींना उजाळा वाचनालयाचे ज्येष्ठ विश्वस्त प्रा़ पुरणचंद्र पुंजाळ यांनी दिला.
उद्या बुधवारी वाचनालयाचा स्थापना दिवस आहे़ यानिमित्त कन्ना चौक येथील वाचनालयात सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत सत्यनारायणाची पूजा आयोजिली आह़े़ तसेच या आठवडाभरात वाचनालयाने विविध उपक्रम आयोजित केले होते़वाचनालयाचे वैशिष्ट्य म्हणजे वाचनालयाचे सर्व पदाधिकारी हे अमराठी अर्थात तेलुगू भाषिक आहेत़ आज वाचनालय अख्या महाराष्ट्रात नावलौकिक मिळवले आहे़ अवघ्या काही पुस्तकांवर सुरु झालेल्या वाचनालयात आज ३० हजार पेक्षा अधिक पुस्तके आहेत़ यात तेलुगू, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तकांचा समावेश आहे़ आणि २५ हून अधिक दैनिके, १५ साप्ताहिके, १० पाक्षिक, ७५ मासिक वाचकांच्या सेवे आहेत़ बहुभाषिक वाचनालय म्हणून पूर्व विभाग वाचनालयाची ओळख आहे़ विशेष म्हणजे, वाचनालयास १९९७ साली महाराष्ट्र राज्य सरकारकडून डॉ़ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालयाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला़ त्यानंतर २०११ साली सहकार महर्षी कै़ शंकरराव मोहिते पाटील आदर्श ग्रंथालय अशा मानाचाही पुरस्कार वाचनालयास मिळाला आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै़ विलासराव देशमुख, माजी उपमुख्यमंत्री आऱ आऱ पाटील यांच्यासह दिग्गजांनी वाचनालयास भेट दिली़ वाचनालयाच्या विद्यमान अध्यक्ष शैला अन्नलदास, उपाध्यक्ष दत्तात्रय कारमपुरी, सचिव नारायण पुजारी, खजिनदार गणपतराव कुरापाटी, सहकार्यवाहक आनंद वल्लाकाटी तसेच विश्वस्त म्हणून यल्लादास गज्जम आणि प्रा़ पुरणचंद्र पुंजाल यांच्या मार्गदर्शनाखाली वाचनालयाची वाटचाल सुरु आहे.
मोफत तेलुगू वर्ग
- प्रा़ पुंजाल सांगतात, वाचनालयाच्यावतीने आम्ही दरवर्षी मोफत तेलुगू भाषा प्रशिक्षण शिबीर भरवतोय़ तसेच दहावी व बारावी विद्यार्थ्यांना मोफत करिअर मार्गदर्शन शिबीर, योगासन शिबीर, व्यक्तिमत्त्व विकास शिबीर तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते़ वाचन संस्कृती वाढीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत़ याकरिता विविध उपक्रम आयोजित करतो़ वाचनालय अ वर्ग मान्यता प्राप्त आहे़ कन्ना चौक येथील ५ हजार चौरस फूट क्षेत्रफळात वाचनालयाची भव्य इमारत उभी आहे़ वाचनालयाची वाटचाल डिजिटलायझेशनकडे सुरु आहे़ वेबसाईट व ई-मेल आणि कारकोड सिस्टिमही सुरु करण्यात आली आहे़