coronavirus; सीमेवर नाकाबंदी, कर्नाटकातून सोलापूर जिल्ह्यात येणारे रस्ते बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:45 AM2020-03-24T11:45:09+5:302020-03-24T11:53:34+5:30
पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांची माहिती; सीमेवर नऊ ठिकाणी नाकाबंदी, येणाºयांना प्रवेश नाही
सोलापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अन्य राज्यातील प्रवासी महाराष्ट्रात येऊ नयेत म्हणून सोलापूर जिल्ह्याला लागून असलेल्या कर्नाटक राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. आंतरजिल्हा सीमेवर नऊ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. बाहेरील प्रवाशांना प्रवेश करता येणार नाही, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
सोलापूर जिल्हा हा कर्नाटक राज्याच्या सीमेवर आहे. कर्नाटकातून सोलापुरात येणाºया वागदरी (ता. अक्कलकोट), दुधनी (ता. अक्कलकोट), टाकळी (ता. दक्षिण सोलापूर), मरवडे (ता. मंगळवेढा) या ठिकाणी सीमा बंदी करण्यात आली आहे. आंतरजिल्हा बंदी अंतर्गत जिल्ह्याच्या तामलवाडी, बोरामणी, पांगरी, करमाळा, चराटी, नातेपुते, पिलीव, महुद, जुनोनी, भीमानगर या भागात सीमा जिल्हा बंदी करण्यात आली आहे. जिल्ह्याबाहेरील प्रवाशांना आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. राज्याच्या चार तर जिल्ह्याच्या १० अशा मिळून १४ ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी करण्यात आली आहे. येणाºया लोकांना जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही.
अत्यावश्यक सेवा देणारी वाहने व अन्य कर्मचाºयांना राज्य शासनाकडून पासेस दिले आहेत. पासेस असतील तरच त्यांना प्रवेश दिला जाईल. अन्यथा कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. शक्यतो नागरिकांनी प्रवास करू नये, नियमांचे पालन करावे अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिला आहे.