ऑनलाइन क्लासचा आलाय कंटाळा मुले म्हणतात, आता जाऊ द्या ना शाळेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 12:53 PM2021-02-15T12:53:30+5:302021-02-15T12:53:36+5:30
पालकांचीही तयारी : कोरोनाचे नियम मात्र काटेकोर पाळण्याचा आग्रह
सोलापूर : कोरोनामुळे अद्यापपर्यंत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू झालेले नाहीत; पण मुलांचे वर्ग ऑनलाइन सुरू असल्याने त्या शिक्षणाला मुले कंटाळली आहेत. यासाठी मुले शाळेला जाण्यासाठी हट्ट धरत आहेत. बहुतांश पालकही आपल्या पाल्यांना शाळेत पाठवायला तयार आहेत; पण शासनाचे सर्व निर्देश पाळून शाळा सुरू व्हावी, असा पालकांचा आग्रह आहे.
पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग वगळता अन्य वर्ग टप्प्याटप्प्यांनी सुरू झाले आहेत; पण चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत अद्याप ठोस निर्णय झाला नाही. शिक्षक वर्गावर जे शिकवितात ते जास्त समजते. यामुळे आम्ही वर्गात मास्क घालून बसण्यासाठी तयार आहोत, असे मुलांचे मत आहे, तर पालक म्हणतात, शाळेत गेल्यावर मुलांना शिस्त लागते. सोबतच शाळेतील वातावरणाचा सकारात्मक परिणामही मुलांवर होतो, असे पालकांचे म्हणणे आहे. नोकरी, व्यवसायासाठी बाहेर गेल्यावर पाल्यांकडे पूर्ण लक्ष देणारे घरात कोणीही नसतात. यामुळे मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे शाळेत जाणे उत्तम असल्याचे मत काही पालकांनी नोंदविले.
मुख्याध्यापक पुंडलिक कलखांबकर म्हणाले, पहिलीचा वर्ग मुलांना खूप महत्त्वाचा असतो. त्या वर्गात मुलांना अनेक गोष्टी शिकविल्या जातात. यामुळे अनेक संस्कार त्याच्यावर होतात. सोबतच चौथीपर्यंतचे वर्ग मुलांवर मानसिक व शारीरिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे असते. यामुळे शाळा सुरू होणे हे महत्त्वाचे आहे.
शाळेत मुलांना वळण लागते, यामुळे शाळा सुरू होणे हे गरजेचे आहे. सोबतच ऑनलाइन शिक्षणामुळे पूर्ण अभ्यास शिकवून झालेला नाही. ऑनलाइन शिक्षण जास्त प्रभावी नाही. यामुळे लवकरात लवकर शाळा सुरू होणे गरजेचे आहे; पण कोरोनाची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे.
- सोनाली ढब्बे, पालक
शाळा सुरू झाली पाहिजे. मुले पूर्ण वेळ घरात असल्यामुळे त्यांचे अभ्यासात मन लागत नाही. शाळेत मुले हसतखेळत शिकत असतात, यामुळे शाळा सुरू होणे गरजेचे आहे.
गंगाधर बनसोडे, पालक
शाळा बंद असल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे पूर्वीसारखी कोरानाची भीती वाटत नाही; पण मुलांच्या भविष्यासाठी शाळा सुरू व्हायला पाहिजे.
- सिद्धार्थ बनसोडे, पालक
ऑनलाइनला मुलांचा चांगला प्रतिसाद मिळत नाही. मुलांना शाळेत जे वळण लागते ते वळण घरात लागत नाही. यासाठी तरी शाळा सुरू व्हायला पाहिजे. सोबतच मुले लहान असल्यामुळे त्यांना अभ्यासाचे गांभीर्य नसते, यामुळे वर्गात शिक्षक त्यांच्याकडून करून घेत असतात. यासाठी शाळा सुरू होणे गरजेचे आहे.
- डॉ. गुरुनाथ जालीमिंचे, पालक
घरात बसून कंटाळा येत आहे. मोबाइलपेक्षा शिक्षक प्रत्यक्षात शिकवितात ते जास्त कळते. यामुळे शाळेला जाण्यासाठी मी तयार आहे.
- राही ढबे, विद्यार्थी
घरात अभ्यास होत नाहीय, जर काही अभ्यास कळला नाही तर शिक्षकांना विचारू शकतो. ते आम्ही मोबाइलवर विचारू शकत नाही. मोबाइलमुळे डोळ्यांना त्रास होत आहे.
- आदिती बनसोडे, विद्यार्थिनी
चांगली नोकरी मिळण्यासाठी शाळेला जावे लागणार आहे. यामुळे शाळा लवकर सुरू करावी. शिक्षक वर्गात शिकविताना चित्रे, नकाशे यांचा वापर करीत आम्हाला शिकवितात; पण मोबाइलवर तसे आम्हाला जास्त स्पष्ट दिसत नाही. यामुळे शाळेला जावे वाटत आहे.
-शुभम बनसोडे, विद्यार्थी
शाळेत मित्र-मैत्रिणींना भेटायला मिळते. वर्गात शिकविलेले लक्षातही राहते. यामुळे शाळेला जावे असे वाटत आहे. कोरोनामुळे आम्ही मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करू.
- नेत्रा जालिमींचे, विद्यार्थिनी